पुणे

बारामतीत रोजगाराच्या निर्मितीसाठी वाहन उद्योगाची गरज

अमृता चौगुले

अनिल सावळे पाटील

जळोची : बारामतीचा सर्व क्षेत्रांत विकास होत आहे. परंतु, अजूनही तालुक्याला साजेसा असा मोठा उद्योग येथे नाही. एमआयडीसीतील रिकाम्या प्लॉटवर नामांकित कंपन्या आल्यास मोठ्या प्रमाणावर तरुणांना रोजगार मिळणार आहे. खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी होत आहे. पियाजिओ व्हेईकल्स, श्रायबर डायनामिक्स डेअरी, भारत फोर्ज, फेरेरो, बाउली, आयएसएमटीसारख्या नामांकित कंपन्या व इतर छोट्या कंपन्या येथे आहेत.

परंतु, नोकरी शोधणार्‍या तरुणांची संख्या मोठी आहे. एमआयडीसीकडे भरपूर क्षेत्र रिकामे असल्याने नवीन कंपन्यांसाठी सहजपणे जागा उपलब्ध आहे. नवीन कंपन्या आल्या तर अनेकांना रोजगार मिळण्यासह अनेक छोटे-मोठे उद्योगांना वाव मिळणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून 12 डिसेंबर 1988 मध्ये जवळपास 812 हेक्टर जमिनीवर बारामती एमआयडीसीची स्थापना झाली. 915 प्लॉटपैकी अंदाजे 400 प्लॉटवर उद्योग सुरू असून, उर्वरित प्लॉट अद्यापही रिकामेच आहेत. स्पेनटेक्स, कारगिल ऑइलसारखे मोठे उद्योग बंद पडले आहेत. त्यांच्या जागाही अद्याप तशाच आहेत.

सध्या एमआयडीसीमध्ये बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्क, फेरेरो कंपन्यांच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळत आहे. परंतु, टेक्स्टाईल पार्कमध्ये अनेक रिकामे प्लॉट आहेत. एकट्या पियाजिओ कंपनीवर 70 टक्के लघुउद्योग अवलंबून आहेत. याला पर्याय म्हणून बारामतीत एखादा वाहन उद्योग असणे गरजेचे आहे.

लघुउद्योगांना चालना देण्यासाठी बारामती एमआयडीसीला एखाद्या वाहननिर्मिती क्षेत्रातील उद्योगाची गरज आहे. खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे व अजित पवार यांच्या माध्यमातून नवीन कंपन्या आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

                                                – धनंजय जामदार, अध्यक्ष,
                            बारामती इंडस्ट्रिअल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन

बारामती एमआयडीसीतील लघुउद्योजक येथील कंपन्यांवर अवलंबून आहे. नव्या उद्योगाची गरज आहे. नवीन उद्योग आला तर जुन्या उद्योजकांना काम मिळण्यासह नवीन उद्योजक तयार होतील व रोजगारनिर्मिती होईल.

                                                  – प्रमोद काकडे, अध्यक्ष,
                                  बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज

SCROLL FOR NEXT