पुणे : पुढारी वृत्तसेवा : निसर्गातील मानवी हस्तक्षेपामुळे वातावरणीय दुष्परिणाम म्हणजे निसर्गाने दिलेले संकेतच आहेत. ते ओळखून आलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलायला हवीत. तरच पूरपरिस्थिती रोखू शकतो, असा निष्कर्ष वरिष्ठ तज्ज्ञांच्या पूर अभ्यास समितीने काढला आहे. भीमा खो-यातील पूर परिस्थितीचा तांत्रिक अभ्यास, विश्लेषण करून त्याची कारणे शोधणे व त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना सुचविणे, यासाठी ही समिती नेमण्यात आली होती.
निवृत्त सचिव राजेंद्र पावर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली होती. या समितीने भीमा खो-याचा अभ्यास करून अहवाला सादर केला. यावेळी समितीचे सदस्य अविनाश सुर्वे, राजेंद्र मोहिते, विवेकानंद घारे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, अपर मुख्य सचिव, मद्त व पुनर्वसन असिम गुप्ता उपस्थित होते. या समितीमध्ये देशपातळीवरील हवामान विशेषज्ज्ञ अविनाश सुर्वे, विनय कुलकर्णी हेही सदस्य आहेत. या आधी जुलै 2019 मध्ये कृष्णा खो-याचा अभ्यास करण्यासाठी जलसंपदा विभागाने सेवानिवृत्त प्रधान सचिव नंदकुमार वडनेरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती.