भेसळयुक्त पनीर नष्ट  pudhari
पुणे

तुमच्या ताटातील पनीर चांगले आहे का? तब्बल दीड हजार किलो भेसळयुक्त पनीर नष्ट !

दुधाशिवाय केमिकल वापरून पनीर तयार करणाऱ्या टोळ्या सक्रिय

पुढारी वृत्तसेवा

राजगुरुनगर : कोणत्याही दुधाचा वापर न करता केवळ केमिकलचा वापर करून कृत्रिम पनीर बनवणाऱ्या मांजरी खुर्द येथील एका शेतातील गोदामावर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत सापडलेले तब्बल दीड हजार किलो भेसळयुक्त पनीर नष्ट करण्यात आले असून सुमारे पावणेबारा लाख रुपयांचा भेसळीचा मुद्देमालदेखील जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. ६) करण्यात आली. लहान मुलांसह सर्वसामान्य लोकांच्या जिवाशी खेळ करणारे कृत्रिम दूध, दही, पनीर आणि तूप अशा अनेक टोळ्या शहर आणि जिल्ह्यात सक्रिय असून, अशा टोळ्यांची काही माहिती मिळाल्यास त्वरित अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक वाहिद पठाण यांनी अन्न व औषध प्रशासनाला वाघोली येथे भेसळयुक्त व कृत्रिम पनीर बनविण्यात येत असल्याची माहिती दिली. त्यावरून पोलिस व अन्न व औषध प्रशासन यांनी एकत्र कारवाई करत वाघोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माणिकनगर, मांजरी खुर्द येथे एका शेतामध्ये असलेल्या गोडाऊनमध्ये धाड टाकली. या ठिकाणी भेसळयुक्त पनीर बनवण्याचे काम सुरू होते. तेथे गोदाम मालक सोपान छबुराव साळवे (वय ४५, रा. दुबेनगर, वाघोली, पुणे) यांचे गोदामामध्ये तब्बल १ हजार ४०० किलो भेसळयुक्त पनीर, ४०० किलो जीएमएस पावडर, १ हजार ८०० किलो एसएमपी पावडर, ७१८ लिटर पामतेल असा एकूण ११ लाख ५६ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या वेळी पंचनामे करून भेसळयुक्त पनीर नष्ट करण्यात आले. पुढील कायदेशीर कारवाई अन्न व औषध प्रशासन हे करीत आहेत. अशा प्रकारचे अन्नपदार्थ खरेदी करताना सावधानता बाळगावी व असा प्रकार आढळुन आल्यास त्वरित त्याबाबत अन्न व औषध प्रशासन यांचेकडे तक्रार करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना केले.

या कारवाईत पोलिस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलिस निरीक्षक मदन कांबळे, पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, सचिन पवार, गणेश डोंगरे, बाळासाहेब तनपुरे, पोलिस हवालदार सुहास तांबेकर, तसेच अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडील सह आयुक्त (दक्षता) डॉ. राहुल खाडे यांचे मार्गदर्शनाखाली नारायण सरकटे, सहाय्यक आयुक्त (अन्न) बालाजी शिंदे, अन्नसुरक्षा अधिकारी (गुप्त वार्ता) अस्मिता गायकवाड, अन्न सुरक्षा अधिकारी सुप्रिया जगताप, एल. डब्ल्यू. साळवे यांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT