पुणे : जगातील सत्ताकेंद्रे बदलत आहेत, जागतिक भू-राजकारणाचे स्वरूप बदलत आहे आणि त्याचबरोबर तंत्रज्ञानातही वेगाने परिवर्तन होत आहे. भारताच्या लोकसंख्यावाढीचा दर सातत्याने कमी होत असून, येत्या एक-दोन दशकांत देशातील तरुणांचे प्रमाणही कमी होण्यास सुरुवात होऊ शकते. त्यामुळे भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी भारताने आतापासूनच तंत्रज्ञान आणि यंत्रसामर्थ्याची ताकद वाढविणे आवश्यक आहे. विकसित देशांनी मनुष्यबळावरील अवलंबित्व कमी करून तंत्रज्ञानाला प्राधान्य दिले आहे. भारतालाही याच दिशेने वाटचाल करावी लागेल, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले.
पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) मैदानावर आयोजित १५१ व्या दीक्षांत संचलन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर, एनडीएचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल अनिल जग्गी, उपप्रमुख विरेंद्र बैन्स यांच्यासह वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित होते.
कॅडेट्सना मार्गदर्शन करताना राजनाथ सिंह म्हणाले, की युद्ध लढण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला आहे. पूर्वी युद्ध प्रामुख्याने जमीन, समुद्र आणि आकाश या तीन क्षेत्रांपुरते मर्यादित होते. मात्र, आता युद्धाचे स्वरूप व्यापक झाले आहे. सायबर क्षेत्र, अवकाश आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांसारख्या नव्या क्षेत्रांतही युद्ध लढले जात आहे. त्यामुळे भविष्यातील युद्धांसाठी भारतीय संरक्षण दलांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे आणि स्वतःला सतत अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे.
आज जे तंत्रज्ञान कॅडेट्सच्या कामी येत आहे, ते उद्या कालबाह्य होऊ शकते. त्यामुळे शिकण्याची प्रक्रिया कधीही थांबवू नका. बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची क्षमता प्रत्येकामध्ये असली पाहिजे. सातत्याने नवे ज्ञान मिळविणे आणि कौशल्य विकसित करणे ही भविष्यातील लष्करी नेतृत्वाची महत्त्वाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
भारत हा तरुणांचा देश असला, तरी लोकसंख्येची रचना हळूहळू बदलत आहे. लोकसंख्यावाढीचा दर कमी होत असून, येत्या एक-दोन दशकांत देशातील तरुणांचे प्रमाण कमी होऊ लागेल. या बदलाचा देशाच्या प्रगतीवर परिणाम होऊ नये, यासाठी भारताने आतापासूनच आपली क्षमता विकसित केली पाहिजे, असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.
मनुष्यबळाची उपलब्धता कमी झाली, तरी देशाच्या प्रगतीचा वेग कमी होता कामा नये. त्यासाठी तंत्रज्ञान, यंत्रसामर्थ्य आणि आधुनिक कौशल्ये यांना अधिक महत्त्व द्यावे लागेल. विकसित देशांनी बदलत्या लोकसंख्येच्या परिस्थितीशी जुळवून घेत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपली क्षमता वाढवली आहे. भारतानेही या अनुभवातून शिकून भविष्यासाठी सज्ज राहिले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
कॅडेट्सशी संवाद साधताना राजनाथ सिंह यांनी भावनिक नात्यानेही त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, "मी इथे संरक्षणमंत्री म्हणून आलो असलो, तरी तुमच्याशी एका पालकाच्या नात्याने काही गोष्टी बोलू इच्छितो."
आज प्रशिक्षण घेणाऱ्या कॅडेट्सपैकीच काही जण भविष्यात भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदलाचे प्रमुख म्हणून देशाची सेवा करतील. त्यामुळे त्यांच्या खांद्यावर केवळ सैन्याचे नेतृत्व करण्याची नव्हे, तर देशाच्या सुरक्षेची मोठी जबाबदारी असेल. ही जबाबदारी पार पाडताना शौर्य, शिस्त, समर्पण आणि कर्तव्यनिष्ठा या मूल्यांना सर्वोच्च स्थान द्यावे, असे त्यांनी सांगितले.
देशाच्या संरक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांचा उल्लेख करताना राजनाथ सिंह यांनी मेजर सोमनाथ शर्मा, कंपनी क्वार्टरमास्टर हवालदार अब्दुल हमीद आणि कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या शौर्याची आठवण करून दिली. या वीरांनी देशसेवेसाठी दाखवलेले धैर्य आणि समर्पण नव्या पिढीतील अधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या आदर्शातून प्रेरणा घेऊन देशाच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
नेतृत्वगुणांबाबत मार्गदर्शन करताना राजनाथ सिंह यांनी विश्वासाचे महत्त्व अधोरेखित केले. तुम्ही सर्वजण उद्याचे नेते आहात. मात्र, केवळ पद मिळवणे म्हणजे नेतृत्व नव्हे. ज्या व्यक्तीवर त्याचे सहकारी विश्वास ठेवू शकतात, तोच खरा चांगला नेता असतो. नेतृत्व करताना सहकाऱ्यांचा विश्वास संपादन करणे, त्यांना सोबत घेऊन पुढे जाणे आणि जबाबदारी स्वीकारणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.
एनडीएच्या १५१ व्या दीक्षांत संचलन सोहळ्यातून नव्या पिढीतील लष्करी अधिकाऱ्यांना देशसेवेची प्रेरणा देतानाच भविष्यातील युद्धतंत्र, बदलती लोकसंख्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाची गरज यांवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी विशेष भर दिला.
'डायट'ने तक्षशिला विद्यापीठ बनावे : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
'डायट' (डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी - DIAT) आधुनिक काळातील ‘तक्षशिला’ विद्यापीठ बनावे. या संस्थेने जागतिक दर्जाचे शिक्षण आणि संशोधन केंद्र म्हणून विकसित व्हावे आणि देशाच्या सुरक्षा तंत्रज्ञानात भरीव योगदान द्यावे, असे आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संस्थेच्या पदवीदान समारंभात केले.
संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या पुण्यातील खडकवासला भागातील 'डायट' या संस्थेचा १५ वा पदवीप्रदान सोहळा रविवारी संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे कुलगुरू डॉ. बी. व्ही. एच. नारायणमूर्ती, संरक्षण मंत्रालयाचे सचिव राजेशकुमार सिंह यांची उपस्थिती होती.
यावेळी भाषणात संरक्षणमंत्री सिंह म्हणाले की, "देशाच्या सुरक्षेसाठी बौद्धिक क्षमता आणि विज्ञान-तंत्रज्ञानाची ताकद यांचा मेळ आवश्यक आहे. या दोन्ही क्षमता विकसित करण्यात 'डायट'ची महत्त्वाची भूमिका आहे. संस्थेत दोनशेहून अधिक संशोधक आहेत. त्यांचा उपयोग नवनिर्माणासाठी केला पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे विज्ञान, आरोग्य, शिक्षण आणि निर्णय घेण्याच्या पद्धती बदलत आहेत. या बदलांमुळे नव्या संधी निर्माण होतात, तसेच नव्या आव्हानांनाही सामोरे जावे लागते. या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहण्याचा मला आनंद आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील हे एकमेव तांत्रिक विद्यापीठ आहे."