Vikas Lavande Attack Pudhari
पुणे

Vikas Lawande: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक; वारकरी संप्रदायावर टीका केल्याने नाराजी

Vikas Lawande Attack: विकास लवांडे यांच्यावर पुण्यात काळी शाई फेकून धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली आहे. पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Black ink thrown on NCP Leader Vikas Lawande

पुणे : विकास लवांडे यांच्यावर काळी शाई फेकून धक्काबुक्की करण्यात आल्याची गंभीर घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, लवांडे यांनी थेट संग्राम महाराज भंडारे आणि त्यांच्या समर्थकांवर हल्ल्याचा आरोप केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हवेली तालुक्यातील आळंदी मातोबा येथे कार्यक्रम आणि प्रवचन आटोपल्यानंतर विकास लवांडे परतत होते. आज सकाळी सुमारे दहाच्या सुमारास काही जणांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग करून वाहन अडवले. त्यानंतर त्यांच्या अंगावर काळी शाई फेकण्यात आली तसेच धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप लवांडे यांनी केला आहे.


विकास लवांडेंवरील शाईफेकीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओत संग्राम महाराज भंडारे आणि त्यांच्या समर्थकांनी शाईफेक केल्याचे दिसते. 'वारकरी संप्रदायावर टीका करताना विकास लवांडेंनी घुसखोर असा शब्द वापरला होता. गुरुवर्यांसाठी अशा शब्दांचा वापर केला पाहिजे नव्हता', असे संग्राम महाराज भंडारेंनी म्हटले आहे.

याबाबत माहिती देताना लवांडे म्हणाले की, “वारकऱ्यांमधील नथुराम गोडसे असलेले गुंड संग्राम भंडारे आणि त्यांच्यासोबत आलेले १० ते १५ गोरक्षक गुंड तीन चारचाकी वाहनांमधून आले होते. त्यांनी माझी गाडी अडवून माझ्यावर शाई फेकली, धक्काबुक्की केली आणि पिस्तूल दाखवून धमकावले. त्यानंतर ते घटनास्थळावरून पळून गेले.”

घटनेनंतर विकास लवांडे तातडीने लोणी काळभोर पोलीस ठाणे येथे दाखल झाले. त्यांनी या प्रकरणी फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

लवांडे यांनी पुणे पोलिस आयुक्तांना आवाहन करताना म्हटले की, “माझ्यावर हल्ला करणाऱ्या सर्व गुंडांचा तातडीने कायदेशीर बंदोबस्त करण्यात यावा. जोपर्यंत आरोपींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मी लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे सत्याग्रह करणार आहे.”

दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासले जात असून, संबंधित आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर होणारे हल्ले आणि वाढती आक्रमकता यावरूनही आता चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT