विधानसभेसाठी मुलाखती Pudhari
पुणे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष: शक्तिप्रदर्शन करत इच्छुकांनी दिल्या मुलाखती

पुढारी वृत्तसेवा

कार्यकर्त्यांचा लवाजमा, नावे लिहिलेल्या टोप्या, बॅनर, पोस्टर आणि समर्थनाच्या घोषणा अशाप्रकारे जोरदार शक्तिप्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे शहर व जिल्ह्यातील इच्छुकांनी बुधवारी विधानसभेसाठी मुलाखती दिल्या. यामध्ये पुणे शहरातील खडकवासला मतदारसंघातून सर्वाधिक नऊ आणि जुन्नरमधून आठ इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. विशेष म्हणजे बारामती विधानसभेसाठी एकाही इच्छुकाने मुलाखत दिलेली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सर्वच विधानसभा मतदारसंघातून इच्छुकांचे अर्ज मागविले आहेत. इतर राजकीय पक्षाच्या पुढे एक पाऊल टाकत पक्षाच्या वतीने पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात कोकण वगळता राज्यातील सर्वच भागांतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पुणे शहर व जिल्ह्यातील इच्छुकांच्या बुधवारी मुलाखती घेण्यात आल्या.

पक्षाध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, खा. डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, प्रकाश म्हस्के, शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदींनी या मुलाखती घेतल्या. खडकवासला विधानसभा मतदारसंघासाठी सचिन दोडके, अनिता इंगळे, सोपान चव्हाण यांच्यासह 9 इच्छुकांनी मुलाखती दिल्या. त्यानंतर शिवाजीनगरमधून अ‍ॅड. नीलेश निकम, श्रीकांत पाटील, उदय महाले यांच्यासह 7, पर्वतीसाठी अश्विनी कदम, सचिन तावरे यांच्यासह 4, हडपसरमधून शहराध्यक्ष प्रशांत जगताप, बंडू गायकवाड यांच्यासह 4, वडगावशेरी 6, कोथरूड 2, पुणे कॅन्टोन्मेंट 4 आणि कसबा पेठेतून रवींद्र माळवदकर अशा एकूण 37 इच्छुकांच्या मुलाखती झाल्या.

जुन्नरमधून शरदराव लेंडे, अनिल तांबे यांच्यासह आठ इच्छुकांच्या मुलाखती झाल्या, आंबेगावमधून देवदत्त निकम, शेखर पाचंदकर पाटील यांच्यासह 4, खेड-आळंदीमधून अतुल देशमुख, अ‍ॅड. देवेंद्र बुट्टे पाटील, सुधीर मुंगसे, रामदास ठाकूर, अनिल राक्षे यांच्यासह 7, शिरूरमधून आमदार अशोक पवार, अरुण नरके, सूर्यकांत पलांडे, दौंडमधून डॉ. वंदना मोहिते, नामदेव ताकवणे, अप्पासाहेब पवार, पुरंदरमधून संभाजी झेंडे, इंदापूरमधून 4, भोर 2, मावळ 1 अशा 33 जणांनी मुलाखती दिल्या. खेड-आळंदीमधून इच्छुक असणारे अनिल देशमुख आणि सुधीर मुंगसे यांनी या वेळी चांगलेच शक्तिप्रदर्शन केले.

बारामतीमधून एकही अर्ज नाही

बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांच्या पक्षाकडून युगेंद्र पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले जाणार असल्याची चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू आहे. युगेंद्र पवार हेही मतदारसंघातील गावांचे दौरे करत आहेत. अजित पवार यांच्या ऐवजी बारामतीमधून त्यांचे पुत्र जय पवार निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अशातच काल बारामतीमधून अजित पवार हे निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या पक्षाकडून बारामतीसाठी कोण इच्छुक पुढे येतो, याबाबत उत्सुकता होती. मात्र, बुधवारी झालेल्या मुलाखतीच्या सत्रात बारामती मतदारसंघासाठी एकाही इच्छुकाची मुलाखत झाली नाही. त्यामुळे अजित पवारांच्या विरोधातील उमेदवार पवार कुटुंबातील असेल की बाहेरचा, याची उत्कंठा वाढली आहे.

जगदाळे, माने यांची अनुपस्थिती

इंदापूर विधानसभा मतदारसंघातून अप्पासाहेब जगदाळे आणि प्रवीण माने यांनी इच्छुक म्हणून पक्षाकडे अर्ज केला आहे. मात्र, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला सोडचिट्टी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्याने जगदाळे व माने नाराज आहेत. खा. सुप्रिया सुळे व शरद पवार यांच्याकडून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन भूमिका जाहीर करण्याची घोषणा जगदाळे व माने यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी झालेल्या मुलाखतींकडे जगदाळे व माने यांनी पाठ फिरविली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT