पुणे

Pune : 158 ग्रा.पं.वर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता : जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर

अमृता चौगुले

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील 231 ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास दाखवीत तब्बल 158 ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवल्याचा, तर भाजप दुसर्‍यास्थानी, तर शिंदेंची सेना तिसर्‍या स्थानी असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केला. इंदापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले, जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)वर मतदारांनी विश्वास दाखवत सत्ता दिली आहे. पुणे जिल्ह्यातील जनता ही विकासकामाला महत्त्व देते. अजित पवार यांचे कायमस्वरूपी विकासाचे राजकारणच या जनतेला आवश्यक आणि गरजेचे वाटते.

इंदापूर तालुक्यात कोणी काही म्हटलं तरी सहा ग्रामपंचायतींपैकी पाच ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली आहे. मागे जशी ओळख परेड केली होती तशी आम्ही करून दाखवू. असल्या गोंधळात रेटून बोलणे हा कार्यक्रम असतोच. त्या पद्धतीने लोक सांगत असतात, असा टोला गारटकर यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता लगावला. या जिल्ह्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाला कौल दिला आहे ही वस्तुस्थिती आहे. दुसर्‍या क्रमांकावर भाजप आहे, तर तिसर्‍यास्थानी शिवसेना शिंदे यांचा गट आहे. भविष्यात हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे लोकसभा विधानसभा लढवतील आणि नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी यश मिळवतील, तर राज्यात अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही गारटकर यांनी सांगितले.

गारटकर यांचा दावा

  •  एकूण ग्रामपंचायती – (321) (रिक्त 1)
  •  राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – 158
  •  भाजपा – 19
  •  शिवसेना (शिंदे गट) – 4
  •  काँग्रेस – 11
  •  राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – 5
  •  शिवसेना (ठाकरे गट) – 4
  •  अपक्ष – 29
SCROLL FOR NEXT