पुणे

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा ठिय्या ; शहराध्यक्ष जगताप यांच्यासह कार्यकारिणीचा राजीनामा

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या घोषणेचे पडसाद पुण्यात उमटले. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले, तर शहर कार्यालयात कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करून राजीनामा मागे घेण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. सायंकाळी पाचच्या सुमारास शहर राष्ट्रवादी कार्यालयात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले. यामध्ये प्रामुख्याने माजी शहराध्यक्ष माळवदकर, प्रवक्ते प्रदीप देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष नांगरे, नीलेश निकम, काका चव्हाण, रूपाली ठोंबरे-पाटील, शिल्पा भोसले, कुलदीप शर्मा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यकर्त्यांनी पक्षकार्यालयासमोर ठिय्या मांडून 'साहेब, निर्णय मागे घ्या… मागे घ्या…', 'देश का नेता कैसा हो, पवार साहेब जैसा हो…' अशी घोषणाबाजी केली. या वेळी महिला कार्यकर्त्याही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दरम्यान, मुंबईत पवारांच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या शहराध्यक्ष जगताप यांनी पवारसाहेबांनी आपली भूमिका न बदलल्यास माझ्यासह पुणे शहर कार्यकारिणीतील सदस्यांसह राजीनामा देत असल्याचे टिट्वरवरून जाहीर केले.

कितीही इच्छा झाली, तरी किमान भक्तांच्या श्रध्देसाठी देवाला देवपण सोडता येत नाही. अगदी तसेच शरद पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडू नये! जिथे आमचा देव नाही, तिथे नमस्कार नाही.
                                                 प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

SCROLL FOR NEXT