पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : निव्वळ राजकीय हेतूने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे 850 बेडचे रूग्णालय चिखलीऐवजी मोशी येथे बांधण्यात येणार आहे. या निर्णयास नागरिकांचा विरोध असून, चिखली येथेच रूग्णालय उभारावे. अन्यथा आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे विकास साने यांनी बुधवारी (दि.18) पत्रकार परिषदेत दिला आहे. मोरवाडी येथे झालेल्या परिषदेला ग्रामपंचायतचे माजी सदस्य सदाशिव नेवाळे, विष्णू मोरे, अंकुश भांगरे, बाळासाहेब मोरे, साहेबराव रोडे, युवराज पवार, आप्पा साने, संतोष जाधव आदी उपस्थित होते. विकास साने म्हणाले की, चिखली येथील गायरान जमिनीवरील गट क्रमांक 1653, 1654 वरील पालिकेने 20 जानेवारी 2021 ला मंजूर केलेले 850 बेडचे रुग्णालय वनीकरणाचे कारण सांगून अचानक मोशी येथे हलवण्यात आले आहे. पालिकेच्या या सापत्न भूमिकेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
गायरान जमीन असलेल्या गट क्रमांक 1653,1654 यापूर्वीच जलशुद्धीकरण केंद्र, जगद्गगुरू संत तुकाराम महाराज संतपीठ हे उभारले गेले आहे. जमीन वन विभागाच्या ताब्यात असली तरी, वनीकरण कायदा 1980 नुसार आवश्यक ते बदल करून चिखलीतच रुग्णालय उभारणे शक्य आहे. या जागेच्या कागदपत्रांवर अद्यापही इतर हक्कांमध्ये पालिकेचे रुग्णालय, अग्निशमन केंद्र प्राथमिक शाळा अशी नोंद आहे. या जागेत पालिका रुग्णालय उभारण्यात येणार आहे, अशा आशयाचा फलक लावलेला आहे. केवळ रायकीय हेतूने चिखलीतील नागरिकांच्या हक्कावर गदा आणली जात आहे, असा आरोप साने यांनी केला आहे.
ते म्हणाले की, चिखलीतील रूग्णालयासाठी 214 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. तेवढ्यात क्षमतेचे रुग्णालय मोशीत स्थलांतर केले. तेव्हा त्यासाठी 450 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. रुग्णालय उभे राहीपर्यंत हा आकडा 900 कोटी रुपयांपर्यंत जाईल. प्रशासन व राजकीय पुढारी यांच्या संगनमताने होणार्या या भ्रष्टाचारामुळे पालिका तिजोरीवर अतिरिक्त भार पडणार आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. आमदार महेश लांडगे यांनी इच्छाशक्ती दाखवल्यास हे रुग्णालय पुन्हा चिखलीमध्ये स्थलांतरित होऊ शकते. तसे झाले नाही तर, चिखलीतील नागरिकांच्या वतीने आंदोलन छेडले जाईल. वेळप्रसंगी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.