कसबा पेठ; पुढारी वृत्तसेवा: कोरोनामुळे सलग दोन वर्षे प्रतीकात्मक व साधेपणाने साजरा झालेला नवरात्रोत्सव यंदा निर्बंधमुक्त साजरा होत आहे. भाविकांची संख्या वाढण्याचा अंदाज मंडळांकडून व्यक्त केला जात आहे. नवारात्रोत्सवानिमित्त पेठांमधील सोमवारपासून (दि.26) सार्वजनिक मंडळांतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. रास्ते पेठेतील रणरागिणी महिला विचार मंचातर्फे रांगोळी, मेहंदी स्पर्धा, मुला-मुलींसाठी निबंध स्पर्धा, ड्रॉईंग स्पर्धा, महाभोंडला आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
तसेच महिलांसाठी फराळ व ओटीचा कार्यक्रम, होममिनिस्टर, खेळ पैठणीचा कार्यक्रम, तसेच डिस्को दांडिया, कन्यापूजन सोहळा व महिलांच्या हस्ते महाआरती आदी कार्यक्रम होणार असल्याचे मंचाच्या अध्यक्षा उज्वला गौड यांनी सांगितले. सोमवार पेठेतील अखिल सोमवार पेठ नवरात्र महोत्सव मंडळातर्फे मराठी पारंपरिक आर्केस्ट्रा, भजन, कोव्हिडवर आधारित जिवंत देखावा, फराळ, हिंदी गाण्यांचा ऑर्केस्ट्रा, बालमेळावा, होममिनिस्टार, महाभोंडला, भव्य रासदांडिया कार्यक्रमाचे आयोजन असल्याचे अध्यक्ष सचिन शिंदे यांनी सांगितले.
बुधवार पेठेतील वीर हनुमान मंडळातर्फे नवरात्रात देवाची नऊ वेगवेगळी रुपे सादर करणार असून, देवदासी महिलांचा जागर व भजनांचा कार्यक्रम आहे. दसर्याच्या दिवशी देवदासी महिलांचे परडी भरण्याचा कार्यक्रम मंडळातर्फे करण्यात येणार आहे. यामध्ये पाचशेहून अधिक परड्या या कार्यक्रमात असतात, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष आनंद सागरे यांनी दिली.
कसबा पेठेतील नटराज नवरात्र उत्सव मंडळातर्फे रक्तदान शिबिर, तसेच महिलांसाठी लकी ड्रॉ, दांडिया, संगीत खुर्ची, लहानांसाठी चित्रकला घेण्यात येणार असल्याचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी सांगितले. अष्टभुजा महिला मंडळ नवरात्र उत्सवतर्फे महिलांसाठी होममिनिस्टर, दांडिया, भोंडला, लहान मुलांसाठी कन्यापूजन आणि अंध संस्थांचे संगीत कार्यक्रम सादर होणार असल्याचे मंडळाच्या संस्थापिका शोभा काळे यांनी सांगितले.
कालिकादेवी मंदिरात विविध कार्यक्रम
कसबा पेठेतील त्वष्टा कासार समाज संस्थेची कालिकादेवी मंदिरात नऊ दिवस दुर्गा सप्तशतीतील अष्टमातृकांची रुपे साकारण्यात येतील. महिला भजनी मंडळ, भोंडला, गरबा, दांडिया आदी कार्यक्रम होणार अल्याचे उत्सवप्रमुख देवेंद्र वडके यांनी सांगितले.