पुणे : आनंदी अन् उत्साही वातावरणात नवरात्रोत्सवाला सोमवारी (22 सप्टेंबर) सुरुवात होत आहे. तिथीच्या वृद्धीने यंदा नवरात्र दहा दिवसांचे आहे. यावर्षी नवरात्र 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर असे दहा दिवसांचे असून, प्रत्येकाने कुलाचारानुसार घटस्थापना करून पारंपरिक पद्धतीने नवरात्रोत्सव साजरे करावे, असे दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.
अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून शारदीय नवरात्राला सुरुवात होते. यावर्षी 22 सप्टेंबर रोजी नवरात्रोत्सवास सुरुवात होणार असून, याच दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाईल. साधारणपणे नवरात्र नऊ दिवसांचे असते. परंतु तिथीच्या क्षय-वृद्धीमुळे कधी ते आठ, तर कधी दहा दिवसांचे होऊ शकते. यावर्षी तृतीया तिथीची वृद्धी झाल्याने नवरात्र दहा दिवसांचे असणार आहे. गेल्या वर्षीही तृतीया वृद्धीतिथी असल्याने नवरात्र दहा दिवसांचे होते, अशी माहिती दाते यांनी दिली.
नवरात्रातील विशेष सेवा
- ललिता पंचमी : शुक्रवार (26 सप्टेंबर)
- महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) : सोमवारी (29 सप्टेंबर)
- दुर्गाष्टमी, श्रीसरस्वती पूजन, महाष्टमी उपवास : मंगळवारी (30 सप्टेंबर)
- महानवमी, नवरात्रोत्थापन : बुधवारी (1 ऑक्टोबर)
- विजयादशमी (दसरा) : गुरुवारी (2 ऑक्टोबर), (विजय मुहूर्त - दुपारी 2 वाजून 27 मिनिटे ते 3 वाजून 15 मिनिटे)
नवरात्रापूर्वी अशौच आल्याने प्रतिपदेस नवरात्र बसविता येणार नसेल तर अशौच संपल्यावर सप्तरात्रोत्सवारंभ (24 सप्टेंबर), पंचरात्रोत्सवारंभ (27 सप्टेंबर), त्रिरात्रोत्सवारंभ (29 सप्टेंबर) किंवा एकरात्रोत्सवारंभ (30 सप्टेंबर) असे पंचांगात दिलेल्या दिवशी कमी दिवसाचे नवरात्र करावे. नवरात्रोत्सवामध्ये देवीचा टाक किंवा मूर्ती याची वेगळी स्थापना करून पूजा केली जाते. काही कुटुंबांमध्ये इतर देवांची पूजा नऊ दिवस केली जात नाही. अशा वेळेस पूजेतील इतर देवांची अभिषेक करून नेहमीप्रमाणे रोज पूजा करावी आणि घटावर किंवा टाकावर फुलाने पाणी शिंपडून पूजा करावी, असेही दाते यांनी सांगितले.