नवी सांगवी : साई चौक, सांगवी फाटा ते पाण्याची टाकी येथे अतिक्रमण व रस्त्यावरच होणार्या खासगी प्रवासी बसच्या थांब्यामुळे चौकात दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. सायंकाळी सात वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत ट्रॅव्हल बसच्या गर्दीमुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
पार्किंगसाठी वाहनतळाचा अभाव :
नवी सांगवी येथील पाण्याची टाकी, साई चौक, माहेश्वरी चौक, एम. एस. काटे चौक, त्रिमूर्ती चौक या परिसरात सायंकाळच्या सुमारास दिवसेंदिवस वाहतूककोंडीत वाढ होत चालली आहे. खासगी बसच्या पार्किंगसाठी परिसरात वाहनतळ नाही. त्यामुळे नवी सांगवी येथील बा. रा. घोलप विद्यालय ते पिंपळे गुरव येथील त्रिमूर्ती चौक या दरम्यान संध्याकाळी सातनंतर ते मध्यरात्रीपर्यंत खासगी बसेस प्रवाशांसाठी रस्त्याच्या मधोमध उभ्या राहून व्यवसाय करताना दिसत आहेत.
कारवाईनंतरही बसचालकांमध्ये सुधारणा नाही :
वाहतूक विभागातील पोलिस, सांगवी पोलिस कधी-कधी कारवाई करताना दिसतात. कालांतराने पुन्हा जैसे थे परिस्थिती होत आहे. बा. रा. घोलप विद्यालयापासून सांगवी फाट्यावर आले असता पुढे खासगी ट्रॅव्हल बसच्या गर्दीमुळे वाहन चालविणे अवघड जात आहे. पाण्याच्या टाकीपासून साई चौकाकडे आल्यानंतर येथील चौकातून माहेश्वरी चौकाकडे जाण्यासाठी वळण घ्यावे लागते. ट्रॅव्हल बसेस इतक्या लांबलचक असतात की वळण घेताना अनेकदा या बसेसला मागे पुढे करावे लागते. त्यामुळे भर चौकात चोहोबाजूंनी वाहतूक ठप्प होत आहे. या वेळी कोणी कोणाला दाद देत नाही. हॉर्नचा कर्कश आवाज करून वाहतूक चालक थकून जातात. तरीही ट्रॅव्हल बसचालकांमध्ये सुधारणा होत असल्याचे दिसत नाही.
वाहनचालकांना नाहक त्रास :
या वेळी वाहतूककोंडीत एकमेकांना धडकल्यामुळे वाद होण्याचेही प्रकार पाहावयास मिळतात. त्यामुळे अनेक वाहतूकचालकांना वाहतुकीचे नियम पाळूनही कोंडीचा सामना करावा लागत आहे. याचा नाहक त्रास चालकांना सहन करावा लागत आहे. मध्यरात्रीपर्यंत या बस मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी थांबून प्रवाशांची वाट पाहत असल्याने येथील रस्त्यांवर कोंडीला होत आहे. हाकेच्या अंतरावरच पोलिस ठाणे आहे. वाहतूक विभागही आहे. मात्र, ट्रॅव्हल बसचालक या पोलिसांची तमा न बाळगता बिनधास्तपणे अवैधरित्या प्रवाशी वाहतूक करीत असतात.
रस्त्यांवर बस पार्किंग करणार्या चालकांवर सांगवी वाहतूक विभाग कारवाई करीत असते. वाहतुकीस अडथळा करणार्यांवरदेखील कारवाई सुरू आहे. सध्या येथील रस्त्यावर कामेही सुरू आहेत. तरीही रस्त्यांवर बस लावणार्यांवर कारवाई करण्यात येईल.
– प्रसाद गोकुळे, वरिष्ठ वाहतूक पोलिस निरीक्षक