पुणे: नवले पूल परिसरातील प्राणांतिक अपघातांची साखळी थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या पाच वर्षांत या परिसरात 257 अपघात नोंदवले गेले असून, त्यापैकी 95 अपघात गंभीर स्वरूपाचे होते. मागील पाच वर्षात नवले पूल परिसरात 115 जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती वाहतूक पोलिसांकडून समोर आली आहे. याच काळात 94 नागरिक जखमी झाल्याची नोंद आहे. त्यामुळे नवले पूल परिसर मृत्यूचा सापळाच झाला असल्याचे गुरुवारी झालेल्या अपघातामुळे अधिकच अधोरेखित झाले आहे.
नवले पूल हा पुणे-बंगळूरू महामार्गावरील महत्त्वाचा टप्पा असून, सततची वर्दळ, वाहतूककोंडी, एकमेकांना ओलांडून जाण्याची स्पर्धा आणि वेगाची हौस या परिसराला अपघातप्रवण क्षेत्र बनवत आहे. सर्वाधिक अपघात होणारे ब्लॅकस्पॉट म्हणून नवले पूल प्रसिद्ध आहे. या नवले पुलावरून वाहतूक करताना जीव मुठीत घेऊनच नागरिक प्रवास करतात, कारण कधी काय होईल अन् अपघाती मृत्यूला सामोरे जावे लागेल याचा नेम नाही. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वर्ष 2021 ते 2025 या कालावधीत प्राणांतिक अपघातांची संख्या सातत्याने वाढत असताना येथील मृत्यूंचे प्रमाण चिंताजनक आहे.
2021 मध्ये 21 अपघात झाले आणि 28 जणांचा मृत्यू झाला. तर 2022 मध्ये अपघातांची संख्या वाढून 25 झाली आणि मृत्यू 27 झाले. शहरात पाच वर्षांत म्हणजे 260 आठवड्यात 115 जणांचा मृत्यू झाला म्हणजे दोन ते तीन दिवसांनंतर नवले पूल परिसरात एकाचा अपघातील मृत्यू होत असल्याचे भयावह वास्तव आहे.
या सर्व घटनांमुळे नवले रस्ता सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना व वाहतूक तज्ज्ञांनी वारंवार केलेल्या सूचना असे असूनही येथे सुधारणा मंद गतीने होत असल्याची टीका केली जात आहे. पुलाजवळील उतार, अनियमित पार्किंग, चुकीची ओव्हरटेकिंग वेळी कमी दृश्यता आणि वेगमर्यादांचे पालन न होणे ही प्रमुख कारणे म्हणून सांगितले जात आहे. वाहतूक पोलिसांच्या म्हणण्यानुसार येथे सातत्याने गस्त वाढविण्यात आली आहे, परंतु नागरिकांनीही वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे.
अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पुलाखाली व आसपासच्या भागात सिग्नल प्रणाली सुधारण्याची, सीसीटीव्ही कॅमेरे वाढविण्याची, वेगमर्यादा दर्शक फलक अद्ययावत करण्याची आणि रस्त्याच्या डिझाइनमध्ये आवश्यक बदल करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. गेल्या पाच वर्षांत 115 कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले, हे वास्तव या परिसरातील रस्ता सुरक्षेचा प्रश्न किती गंभीर आहे, याची ठळक जाणीव करून देते. पुढील काळात अपघात कमी करण्यासाठी प्रशासन, वाहतूक विभाग, पुणे पोलिस आणि नागरिक यांची संयुक्त प्रयत्नशीलता गरजेची असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
2023 मध्ये सर्वाधिक मृत्यू
2023 वर्षात 22 अपघातांमध्ये 31 जणांचा मृत्यू झाला. हे सर्वांत जास्त मृत्यूसंख्या असलेले वर्ष ठरले. 2024 मध्ये 18 अपघातांत 20 जणांचा मृत्यू झाला. 2025 मध्ये 1 जानेवारी ते 31 ऑक्टोबरपर्यंत 9 अपघात झाले असून, त्यात 9 जणांचा मृत्यू झाला आहे.