पुणे: बँक ऑफ महाराष्ट्रमधील कर्मचार्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या 20 मार्चला एक दिवसाच्या देशव्यापी लाक्षणिक बंदची हाक ‘ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज फेडरेशन’ने दिली आहे. दि. 21 मार्च रोजी बँकिंग सेवा पूर्ववत होईल. त्यानंतर 22 आणि 23 मार्च या शनिवार-रविवारच्या नियमित सुट्यांनंतर 24 आणि 25 मार्च रोजी दोन दिवसांचा संप पुकारण्यात येईल. त्यामुळे बँकिंग सेवा पूर्णतः ठप्प राहील.
दरम्यान, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये रिक्त असलेल्या शिपाई, लिपिक यांसह रिक्त असलेल्या अन्य पदांवरील कर्मचार्यांची भरती तातडीने करावी, बँक व्यवस्थापनाने मनमानी कारभार थांबवावा, कर्मचार्यांशी केलेल्या कराराचे पालन करावे, ग्राहकांस चांगल्या व सुरक्षित सेवा द्याव्यात आदी मागण्यांसाठी ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज फेडरेशनच्या वतीने सोमवारी (दि.17) शिवाजीनगरमधील ‘लोकमंगल’ मुख्यालयासमोर सकाळी तीव्रता धरणे आंदोलन करत परिसर दणाणून सोडला.
धरणे आंदोलनात 51 झोनल ऑफिसमधील सुमारे 600 पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. बँकिंग युनियन्सचे प्रतिनिधी कॉम्रेड कृष्णा बारूरकर, संतोष गदादे, सीटूचे अजित अभ्यंकर, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सचे संयोजक कॉम्रेड विठ्ठल माने व सहसंयोजक कॉम्रेड शिरीष राणे आदींनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनात अन्य राज्यांतूनही पाठिंबा मिळाला.
सार्वजनिक क्षेत्रातील बँका नफ्यात आहेत, पण त्याचा फायदा नेमका कोणाला होतो, हे समजून घेतले पाहिजे. कंत्राटी व आउटसोर्स कर्मचार्यांकडून कायमस्वरूपी बँकिंग कामे करवून घेतली जात आहेत. बँकेने सफाई कर्मचार्यांची पदे पूर्णतः रद्द केली आहेत. 800हून अधिक शाखांमध्ये शिपाई नाहीत. 300हून अधिक शाखांमध्ये एकही लिपिक नाही. 1300हून अधिक शाखांमध्ये केवळ एकच कर्मचारी सर्व कामकाज हाताळतो, ही बाब गंभीर आहे.- देविदास तुळजापूरकर, सरचिटणीस, बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज फेडरेशन