पुणे महापालिका  pudhari
पुणे

Pune Municiple corp : पुणे महापालिकेला राष्ट्रीय जल पुरस्कार

पुढारी वृत्तसेवा

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयातर्फे पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि जलसंवर्धनासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांसाठी पुणे महापालिकेला शहरी विभागात तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार 22 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील विज्ञान भवन येथे दिला जाणार असल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.

राष्ट्रीय जल पुरस्कारांसाठी शहरी विभागातून पुणे महापालिकेने तत्कालीन आयुक्त विक्रम कुमार यांच्या नावाने प्रस्ताव पाठविला होता. शहरातील 76 टक्के घरांमध्ये नळाद्वारे पाणी पुरवले जाते. शहरात दररोज चार तास पाणीपुरवठा होतो. दररोज दरडोई 157 लीटर पाणीपुरवठा होतो. शहरातील 43 टक्के नळजोडांवर मीटर बसविण्यात आले आहेत. पुणेकरांना 100 टक्के दर्जेदार पाणी पुरवले जाते. तसेच पाणीपुरवठ्याबाबतच्या 85 टक्के तक्रारींचे निवारण केले जाते. पाणीपट्टीच्या वसुलीचे प्रमाण 60 टक्के असून, महसूल न मिळणार्‍या पाण्याचे प्रमाण 30 टक्के आहे, असा दावा पालिकेने या पुरस्कारासाठी पाठवलेल्या प्रस्तावात केला आहे.

शहरात 100 टक्के रहिवासी भागात शौचालये असून, त्यांची एकूण संख्या सहा लाख 19 हजार 822 आहे. यात 822 कम्युनिटी, तर 292 पब्लिक टॉयलेट्सचा समावेश आहे. तर शहराच्या विविध भागांत 194 मुतार्‍या आहेत. शहरातील 98 टक्के भागांत सांडपाणी वाहिन्यांचे जाळे आहे. शहरात दररोज निर्माण होणार्‍या 75 टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. यापैकी 60 टक्के पाण्याचा पुनर्वापर कृषी, सिंचन, बांधकाम, उद्याने, जेटिंग मशिन आदी माध्यमातून केला जातो. तसेच जलसंवर्धनासाठी विविध उपक्रम राबवले जातात. नैसर्गिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन केले जात आहे. पर्जन्यजल पुनर्भरण, भूजल पुनर्भरण प्रकल्प राबवले जात आहे. प्रकल्प राबविणार्‍या मिळकतधारकांना मिळकतकरात सवलत दिली जाते. तसेच जलसंवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीही केली जाते, असे पालिकेने जलशक्ती मंत्रालयाला पाठवलेल्या प्रस्तावात नमूद आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT