राष्ट्रीय पोषण सप्ताह: लठ्ठ मुलांना प्रौढावस्थेत गंभीर आरोग्य समस्यांचा धोका  Pudhari
पुणे

राष्ट्रीय पोषण सप्ताह: लठ्ठ मुलांना प्रौढावस्थेत गंभीर आरोग्य समस्यांचा धोका

लठ्ठ मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, ती चिंतेची बाब ठरत आहे.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी जागतिक स्तरावर पाच वर्षांखालील 35 दशलक्षांहून अधिक मुलांना जास्त वजनाची मुले म्हणून वर्गीकृत करण्यात आले. लठ्ठ मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, ती चिंतेची बाब ठरत आहे.

बालवयातील लठ्ठपणावर वेळीच लक्ष न दिल्यास भविष्यात मधुमेह आणि उच्च रक्तदाब, यासारखे गंभीर आजार उद्भवण्याचा धोका वाढतो. त्यामुळे योग्य पोषण आहार हाच लठ्ठपणावरील रामबाण उपाय असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. (Latest Pune News)

दरवर्षी 1 ते 7 सप्टेंबरदरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जातो. संतुलित आहाराचे महत्त्व अधोरेखित करणे आणि त्याबाबत जनजागृती करणे हा यामागचा उद्देश आहे. ’चांगल्या आयुष्यासाठी योग्य आहार’ हे यंदाच्या सप्ताहाचे बोधवाक्य असून, लहान वयात पोषक आहार न दिल्यास मुलांना दीर्घकालीन समस्यांचा सामना करण्याची वेळ येऊ शकते, याकडे आहारतज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.

लठ्ठपणामुळे जुनाट आजारच नाहीत तर आत्मविश्वास कमी होणे आणि नैराश्य यासारख्या भावनिक आणि मानसिक आरोग्य समस्यांचा देखील समावेश असतो. भविष्यातील गुंतागुंत टाळण्यासाठी आणि आपल्या मुलांनी निरोगी राहावे, यासाठी पालकांनी मुलांना आहाराच्या निरोगी सवयी लावणे आणि नियमित शारीरिक हालचालींनी वजन व्यवस्थापन करणे आवश्यक आहे, असे मत बालरोगतज्ज्ञ डॉ. मिहीर दामले यांनी व्यक्त केले आहे.

आजारांचा धोका?

  • टाइप 2 मधुमेह

  • उच्च कोलेस्ट्रॉल

  • यकृताच्या समस्या

  • अस्थिरोग समस्या

  • हृदयरोग

पालकांनी मुलांच्या संतुलित आहाराच्या सवयींना प्रोत्साहन देत स्क्रीन टाइम कमी करून शारीरिक हालचालींना प्रोत्साहन दिले पाहिजे. फळे, भाज्या, तृणधान्य, डाळी, मसूर, सुकामेवा आणि तेलबिया यांचा आहारात समावेश करा. घरी शिजवलेल्या अन्नाचे सेवन करा, तसेच जेवणाच्या वेळा पाळा. टीव्ही पाहताना किंवा गॅझेट्सचा वापर करताना शर्करायुक्त पदार्थ, तळलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ, सॉफ्ट ड्रिंक्सचे सेवन टाळा.
- डॉ. अंजली शिंदे, क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT