Law Pudhari
पुणे

Nasrapur Case: नसरापूर चिमुकली हत्या प्रकरणात मोठी घडामोड; आरोपीची सीसीटीव्हीवर कबुली, न्यायालयात सुनावणी निर्णायक टप्प्यावर

भीमराव कांबळेने स्वतःची ओळख मान्य केली; डीएनए अहवालातही धक्कादायक निष्कर्ष, आज अंतिम युक्तिवाद होणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: नसरापूर येथील तीन वर्षीय चिमुकलीचे अपहरण, लैंगिक अत्याचार व हत्या प्रकरणात न्यायालयात सादर केलेल्या सीसीटीव्हीत दिसणारा व्यक्ती मीच आहे, अशी कबुली आरोपी भीमराव कांबळेने शुक्रवारी (दि. १९) न्यायालयात दिली. सुरुवातीला सीसीटीव्ही फुटेज दाखवल्यानंतर ते नाकारणाऱ्या कांबळेला सर्व फुटेज सहा ते सात वेळा झूम करून दाखवले. अखेर, त्याने ती व्यक्ती आपणच असल्याचे सांगितले. परंतु, सीसीटीव्हीमध्ये दिसणारी चिमुकली कोण हे माहीत नसल्याचे सांगून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला.

शुक्रवारी सकाळी ११ वाजता पोलिस बंदोबस्तात कांबळेला विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात हजर केले. 'भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३' च्या कलम ३५१ अन्वये त्याचा जबाब नोंदविण्यात आला. न्यायालयाने मराठी भाषेत ५५ साक्षीदारांचे पुरावे समजावून सांगत कांबळेला ८८ प्रश्न विचारले. यादरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीसोबत एक लहान मुलगी घटनास्थळाकडे जाताना आणि काही वेळाने आरोपी एकटाच परतताना दिसत असल्याबाबत न्यायालयाने आरोपीकडे विचारणा केली.

त्याने घटनेबाबत स्वतःची बाजू मांडताना सांगितले की, घटनेच्या दिवशी मी घायवळांच्या शेडमध्ये गेलो, त्यावेळी तिथे मुलगी आली. तिला गाठी शेव खाण्यास दिली. तिला गोठ्यात नेताना माझा पाय घसरला, ज्यामुळे मुलीच्या डोक्याला मार लागला व ती रडू लागली. तिला खाटेवर झोपवले. ती ओरडत होती. लोक आरोप करतील म्हणून मी तिला तिथेच सोडून निघून गेलो व कट्ट्यावर जाऊन बसल्याचे सांगितले. तसेच, कोणताही पुरावा किंवा साक्षीदार तपासण्यास नकार दिला.

सुनावणीदरम्यान, विशेष सरकारी वकील अजय मिसर, ॲड. सुरेश गायकवाड, ॲड. प्रथमेश शिंगणे हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर होते. सरकारी वकिलांनी न्यायालयात सादर केलेल्या डीएनए अहवालामुळे पीडितेच्या शरीरावर, गुप्तांगावर आणि तिच्या तोंडात कोंबलेल्या स्लॅकमध्ये आरोपीचा डीएनए आढळला आहे. त्यानेच हा गुन्हा केल्याचे सिद्ध होत असल्याचे न्यायालयाला सांगितले. आरोपीतर्फे हिम्मतराव सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस अधिकारी राजेंद्र मायने, विजयमाला पवार न्यायालयात हजर होते.

आज होणार अंतिम युक्तिवाद

गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या १६ दिवसांत ५५ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवित त्यांचा उलटतपास पूर्ण केला आहे. तसेच ३५५ पेक्षा जास्त कागदपत्रे न्यायालयात सरकार पक्षाने सादर केली. विशेष सरकारी वकील अजय मिसर, ॲड. सुरेश गायकवाड आणि ॲड. प्रथमेश शिंगणे शनिवारी (दि.२०) सरकार पक्षातर्फे, तर ज्येष्ठ विधिज्ञ हिम्मतराव सूर्यवंशी आरोपीतर्फे अंतिम युक्तिवाद करतील. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा आधार घेत होणाऱ्या या युक्तिवादाकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT