नसरापूर: बनेश्वर देवस्थान मंदिराच्या विकास आराखड्यातून प्रलंबित राहिलेल्या बनेश्वर रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू करण्यात आले आहे. या रस्त्याच्या कामामुळे बनेश्वर मंदिरपर्यंत 20 दिवस रस्ता बंद राहणार असल्याने भाविकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन नसरापूर ग््राामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
नसरापूर (ता. भोर) येथील मेन आळी ते बनेश्वर रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन मंगळवारी (दि. 24) करण्यात आले. यावेळी सरपंच उषा कदम, माजी उपसरपंच संदीप कदम, सुधीर वाल्हेकर, नामदेव चव्हाण, सुनीता कदम, दीपाली वाल्हेकर, पीएमआरडीएचे सल्लागार धीरज गायकवाड, सबठेकेदार सूरज मरळ, अमित पवार, नवनाथ शिर्के आदी उपस्थित होते. यावेळी रस्त्याचे काम अंदाजपत्रकानुसार दर्जेदार करण्याची मागणी देखील करण्यात आली.
श्रीक्षेत्र बनेश्वर मंदिर रस्त्याच्या कामाची सुरुवात करण्यात आली असून, एका बाजूचे काँक्रीट काम पूर्ण केल्यानंतर तातडीने दुसऱ्या बाजूच्या रस्त्याचे काम देखील करणार असल्याने 20 दिवस बनेश्वर रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. पुणे आणि साताऱ्याकडून येणाऱ्या भाविकांनी नसरापूरमार्गे न येता केळवडे गावातून बनेश्वर मंदिराकडे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यादरम्यान वाद घालणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.