पीएमपीमध्ये आता कडक शिस्तीचा ‘नार्वेकर पॅटर्न’!  File Photo
पुणे

पीएमपीमध्ये आता कडक शिस्तीचा ‘नार्वेकर पॅटर्न’!

लेटलतिफ, कामात दिरंगाई करणार्‍यांवर होणार शिस्तभंगांची कारवाई

प्रसाद जगताप

पुणे : पीएमपीएमएलमध्ये काही अधिकारी, कर्मचारी नागरिकांच्या कामांसाठी तारीख पे तारीख देत, महिनोमहिने लावत असून, जाणूनबुजून दिरंगाई करत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यावर उपाय म्हणून पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी कडक शिस्तीचा नार्वेकर पॅटर्न लागू केला आहे.

‘सात दिवसांत फाइलींचा निपटारा करा अन्यथा शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जा, असा आदेश त्यांनी नुकताच काढला आहे. नार्वेकरांच्या या आदेशाने पीएमपी प्रशासन हादरले असून, पीएमपीच्या वर्तुळात या ‘नार्वेकर’ पॅटर्नची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी 2008 मध्ये ‘झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल’चा ‘दळवी’ पॅटर्न राबवून संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले होते. दाखल होणारा अर्ज त्याच दिवशी कार्यवाहीसाठी पुढे जाईल व वरिष्ठ अधिकारीही योग्य ती कार्यवाही करून त्याचा निपटारा करतील, अशा या कार्यपद्धतीमुळे नागरिकांची कामे विनाविलंब होऊ लागली.

त्याची दखल घेत, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यभर त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना ‘यशदा’मध्ये खास प्रशिक्षण दिले होते.

पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी पीएमपीमधील कामकाज जलदगतीने होण्यासाठी जारी केलेल्या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी झाली. तर ‘दळवी’ पॅटर्नप्रमाणे नार्वेकर यांच्या कडक शिस्तीच्या ‘नार्वेकर पॅटर्न’चेही अनुकरण राज्यभर होईल, असे मत वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्‍यांनी व्यक्त केले आहे.

पीएमपीतील सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, सर्व आगार व्यवस्थापक, अभियंते आणि कर्मचार्‍यांना त्यांनी हा आदेश लागू केला आहे. त्यानुसार आता पीएमपीतील कार्यालयीन कामांसह नागरिकांच्या कामांचा निपटारा सात दिवसांत झाला नाही, तर संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

या आदेशाने पीएमपीच्या वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून, प्रत्येक जण आपल्याकडील कामाचा निपटारा करण्यात गुंतले असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. कामाची ही पद्धत पुढेही सुरू राहिली, तर प्रवाशांची रखडलेली कामे झटपट मार्गी लागतील, असा विश्वास काही अधिकार्‍यांकडून व्यक्त केला जात आहे.

आरटीओतही चालला होता ‘शिंदे पॅटर्न’

पूर्वी पुणे आरटीओतदेखील नागरिकांची कामे महिनोमहिने पेंडिंग असत. कच्च्या आणि पक्क्या परवान्यासाठी नागरिकांना महिनोमहिने वेटिंग करावे लागत. मात्र, तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी पदभार घेतल्यानंतर पुणे आरटीओत ‘झिरो पेंन्डन्सी’ उपक्रम राबवला आणि परवान्यासाठी असलेले महिनोमहिने असलेले वेटिंग कमी केले व अन्य वाहनांसंदर्भातील प्रलंबित कामेदेखील तत्काळ मार्गी लावली.

अजूनही पुणे आरटीओ कार्यालयाचा कारभार तसाच चांगल्याप्रकारे सुरू असून, नागरिकांचे परवान्यासाठीचे वेटिंग कमी झाले आहे. ऑनलाइनमुळे तर कच्चा परवाना तत्काळ मिळत आहे. तर पक्का परवान्याला अर्ज केल्यावर दुसर्‍या किंवा तिसर्‍या दिवशी अपॉईंटमेंट मिळत आहे. अन्य कागदपत्रांची कामेदेखील वेगाने होत आहेत.

कर्तव्यावर वेळेवर हजर न झाल्यास कडक कारवाई

अधिकारी, कर्मचार्‍याला नेमून दिलेली किंवा त्याच्याशी संबंधित असलेली कर्तव्ये किंवा कार्यालयीन कामे पार पाडण्यास त्याने जाणूनबुजून किंवा हेतूपुरस्सर विलंब लावला असेल किंवा त्यात हयगय केली असेल, तर अशा कर्मचार्‍यांवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 अन्वये कारवाई होणार आहे.

तसेच, कर्मचार्‍याला लागू असलेल्या अन्य कोणत्याही संबंध शिस्तविषयक नियमानुसार शिस्तभंग कारवाई करण्यात येईल. सर्व अधिकारी/ कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेमध्ये हजर राहावे. कार्यालयीन वेळेपेक्षा विलंबाने कर्तव्यावर हजर झाल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे पीएमपीएमएलचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी आदेशात म्हटले आहे.

प्रवाशांच्या तक्रारींच तात्काळ निरसण होणार का ?

पीएमपी बसमधून प्रवास करताना प्रवाशांना अनेक समस्या येत असतात. त्यांचे निराकरण करण्यासाठी पीएमपीकडून तक्रार निवारण विभाग सुरू केला आहे. मात्र, कधी- कधी प्रवाशांच्या तक्रारी सुटण्यासाठी दिरंगाई होत असल्याचा अनुभव प्रवाशांना येत असतो. परंतु, आता पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी काढलेल्या या आदेशानंतर पीएमपी प्रवाशांच्या तक्रारी सोडवण्याचा वेग वाढणार का ? असा सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.

आदेशात काय म्हटले...

  • प्रत्येक अधिकारी/ कर्मचार्‍याने त्या नेमून

  • दिलेली किंवा त्याच्याशी संबंधित असलेली कर्तव्ये व कार्यालयीन कामे अत्यंत दक्षतेने आणि शक्य तितक्या शीघ्रतेने पार पाडावीत.

  • साधारणपणे कोणतीही फाइल कार्यालयातील कोणत्याही कर्मचार्‍याच्या टेबलावर कामाचे सात दिवस व अधिक काळ प्रलंबित ठेवू नये.तत्काळ आणि तातडीच्या स्वरूपाच्या फाइली, त्या प्रकरणाच्या निकडीनुसार शक्य तितक्या शीघ्रतेनेआणि प्राधान्याने, तत्काळ फाइली शक्यतो एका दिवसात किंवा दुसर्‍या दिवशी सकाळी आणि तातडीच्या स्वरूपाची फाइल शक्यतो चार दिवसांत निकाली काढावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT