नसरापूर : नसरापूरमध्ये एका नराधम वृद्धाने साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून, दगडाने ठेचून खून केला. या घटनेनंतर नागरिकांमध्ये मोठी संतापाची लाट उसळली आहे. "आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला ठेचून मारू" असा पवित्रा येथील गावकऱ्यांनी घेतला आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळपासून हजारो नागरिक रस्त्यावर उतरले असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पीडित मृत्युमुखी मुलीचे शवविच्छेदन ससून रुग्णालयात सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तर नराधम आरोपीने मुलीवर अत्याचार केले असल्याचे शवविच्छेदनंतर स्पष्ट होणार आहे. भोर आणि राजगड तालुक्याला जोडणारी महत्त्वाची बाजारपेठ असणाऱ्या गावात भीमाजी कांबळे (वय ६५) या नराधम आरोपीने एका साडेतीन वर्षाच्या मुलीला गोठ्यातील पत्रा वजा शेडमध्ये नेऊन अत्याचार करून तिचा खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. १ ) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घटना घडली होती. या निषेधार्थ शुक्रवारी रात्री पुणे सातारा महामार्ग ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केले होते. तर आज शनिवारी (दि.२) नसरापूर बाजारपेठ बंद ठेऊन पदयात्रा काढून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
सध्या नसरापूर वेल्हे रस्त्यावर ग्रामस्थ आणि महिलांनी ठिय्या मांडला असून जोपर्यंत जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी येत नाहीत तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा पवित्रा घेत पुन्हा पुणे सातारा महामार्गवर रास्ता रोको करण्यात आला आहे. पदयात्रामध्ये नसरापूरतील नागरिक, जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती, सदस्य विविध संघटनेचे पदाधिकारी तसेच जवळपास हजारो नागरिक उपस्थित होते.
चौकशी कशासाठी?
आरोपी भिमाजी कांबळे याने एका मुलीवर यापूर्वी अत्याचार केले असून त्याच्यावर राजगड पोलीस ठाण्यात दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्याची जर आरोपीने कबुली दिली असेल तर चौकशी कशासाठी? असा खडा सवाल तरुणांनी केला आहे.