धायरी : नुकत्याच झालेल्या नऱ्हे पोलिस ठाण्याच्या घोषणेनंतर काही महिन्यांच्या अवधीतच नऱ्हे पोलिस ठाण्याचे उद्घाटन आचारसंहिता लागण्याच्या काही वेळेपूर्वीच सोमवारी (दि. १५) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप दाइंगडे व नऱ्हे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आसाराम शेटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पोलिस निरीक्षक उल्हास कदम, सहायक पोलिस निरीक्षक समीर चव्हाण व पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सध्या या पोलिस ठाण्यांतर्गत नऱ्हे पोलिस चौकीची जुनीच हद्द कायम ठेवण्यात आली असून, मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाची कात्रज नवीन बोगद्यापासून ते मुठा नदीपर्यंत हद्द सोपविण्यात आली आहे. या पोलिस ठाण्यात सर्व विभाग व एकशे साठ अधिकारी-कर्मचार्यांची नेमणूक केली आहे.