Traffic Pudhari
पुणे

Narhe Dhayari Traffic Jam: नऱ्हे-धायरीत वाहतूक कोंडीचा कहर; दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकापर्यंत वाहतुकीचा बोजवारा; विद्यार्थी, कामगारांसह वाहनचालक त्रस्त

पुढारी वृत्तसेवा

धायरी: नऱ्हे येथील भूमकर चौक, वेताळबाबा चौक, झील कॉलेज चौक परिसरात मंगळवारी सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. भूमकर चौकातील दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यांवर सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, तर नऱ्हेच्या दिशेने वेताळ बाबा चौक, झील कॉलेज चौक ते श्री कंट्रोल चौकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला.

वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक, विद्यार्थी, कामगार आणि नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. काही चाकरमान्यांनी वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचणे अवघड झाल्याने परतीचा मार्ग स्वीकारला. वाहतूक कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांचीही चांगलीच दमछाक झाली.

सिंहगड व नऱ्हे पोलिस ठाण्यांच्या कर्मचार्‍यांसह वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र, वाहनांची वाढलेली संख्या आणि अरुंद रस्त्यांमुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, या समस्येतून तातडीने सुटका करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

दोन दिवस सलग सुट्या आणि त्यानंतर सण असल्याने मंगळवारी रस्त्यांवरील वाहनांची संख्या अचानक वाढल्यामुळे वाहतूक कोंडी झाली. सिंहगड रोड आणि नऱ्हे पोलिस ठाण्यांच्या कर्मचार्‍यांसह वाहतूक शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करीत होते. वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाच्या सहकार्याने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील.
राहुल गौड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सिंहगड रोड वाहतूक शाखा
दररोजच्या वाहतूक कोंडीने नागरिक वैतागले आहेत. वाहनचालक, नागरिक, विद्यार्थी आणि कामगारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येतून नागरिकांची तातडीने सुटका करावी; अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
सागर भूमकर, माजी उपसरपंच, नऱ्हे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT