पुणे

सणसवाडीत नरेश्वर वनराईला आग; समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी

अमृता चौगुले

शिक्रापूर (ता. शिरूर); पुढारी वृत्तसेवा : सणसवाडी येथील नरेश्वर मंदिर परिसरातील जवळपास सहा हजार झाडे काही समाजकंटकांनी लावलेल्या आगीत जळून खाक झाली. आग लागल्याने गवत व पक्ष्यांची घरटीसुद्धा जळून गेली. गेल्या सात वर्षांपासून ग्रामस्थांनी काही कंपन्यांच्या मदतीने ही वनराई जोपासली होती. अनेक देशी व औषधी वनस्तपतींची लागवड या वनराईत करण्यात आली होती. ही झाडे जळून खाक झाली आहेत.

सणसवाडी येथील नरेश्वर मंदिर परिसरात ग्रामपंचायत, विविध कंपन्या, उद्योजक व ग्रामस्थांमार्फत सामाजिक दायित्व म्हणून वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करण्यात येत होते. ग्रामपंचायतीने पाणी उपलब्ध करून दिले होते. या ठिकाणी वाढत्या वनराईमुळे विविध पक्षी, मोर, मधमाश्या व घोरपड यांचा अधिवास वाढला होता. परंतु, आगीमुळे वृक्षराजी व पक्ष्यांचा निवारा नष्ट झाला आहे.

आग लागल्यानंतर सोमनाथ दरेकर यांनी तातडीने पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला तसेच वाघोली येथील अग्निशमन दलाची गाडी आल्याने संपूर्ण डोंगर आगीपासून वाचला. याबाबत सामाजिक कार्यकर्ते अर्जुन सैद म्हणाले की, अनेक तळीराम व जोडपी या भागात फिरत असतात. अनेकदा फोटो सेशन करताना झाडांच्या फांद्या मोडून टाकतात. अनेक गुराखी येथे गुरे चारतात. वन विभागाला विनंती करूनसुद्धा जाळपट्टे काढले जात नाहीत. त्यामुळे ही परिस्थिती ओढवली.

आग नियंत्रणात आणण्यासाठी पोपट ढेरंगे, मच्छिंद्र हरगुडे, माजी उपसरपंच सागर दरेकर, सागर हरगुडे, संतोष दरेकर, नामदेव हरगुडे, संजोग तांबे, ग्रामविकास अधिकारी बी. एच. पवणे, माजी सरपंच रमेश सातपुते, फोसिको कंपनीचे काही अधिकारी, वन विभागाचे कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

SCROLL FOR NEXT