नारायणगाव: जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत आहे. उत्पादन घटल्याने चांगला बाजारभाव मिळून देखील भांडवली खर्च निघत नाही, अशी खंत शेतकरी बांधव व्यक्त करीत आहेत. सध्या टोमॅटोच्या 22 किलोच्या एका क्रेटला 900 रुपये बाजारभाव मिळत आहे.
टोमॅटोचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून टोमॅटोवर रोगांचा प्रादुर्भाव व विविध व्हायरस वाढल्याने यंदा टोमॅटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. एका एकरमध्ये अवघी 400 क्रेट टोमॅटो निघत आहेत. पूर्वी एका एकरमध्ये 1 हजार 500 ते 2 हजार टोमॅटोचे क्रेट निघत होते. यंदा आकसा नावाचा व्हायरस वाढल्याने टोमॅटो पिकावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे मार्केटमध्ये आवक देखील घटली आहे. सध्या दररोज 6 ते 7 हजारांचे आसपास टोमॅटो क्रेटची आवक होत आहे.
यंदा बाजार जास्त असून देखील शेतकऱ्याला टोमॅटोचे पीक परवडत नाही, अशी खंत येडगावचे शेतकरी चंद्रकांत हांडे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले आम्ही 30 गुंठ्यामध्ये यापूर्वी 1 हजार ते 1 हजार 500 टोमॅटो क्रेट उत्पादन काढत होतो. परंतु आता याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. सध्या एका एकरामध्ये अवघे 400 ते 500 क्रेट टोमॅटो निघत आहेत. त्यामुळे बाजारभाव कितीही असला तरी टोमॅटो पीक घेण्यासाठी लागणारा खर्च आणि सध्या मिळत असलेला बाजार भाव यामध्ये खूपच तफावत आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी टोमॅटो उत्पादक शेतकरी अधिक बाजार भाव मिळून देखील तोट्यात गेला असल्याची खंत हांडे यांनी व्यक्त केली.
विविध रोगांमुळे शेतकरी वळला अन्य पिकांकडे
जुन्नर व आंबेगाव हे दोन तालुके टोमॅटो पिकाचे आगर म्हणून ओळखले जातात. परंतु गेल्या तीन-चार वर्षांपासून टोमॅटो पिकावर विविध प्रकारचे व्हायरस येत असल्याने व त्यावर शासनाला काही निदान शोधता न आल्याने शेतकरी आता या पिकाकडे दुर्लक्ष करू लागला असून इतर पिकाकडे वळला आहे.
हिरव्या टोमॅटोला मागणी कमी
टोमॅटो पिकावर येणारे व्हायरस, तसेच इतर होणारे प्रादुर्भाव यासंदर्भामध्ये शासनाच्या कृषी विभागाने तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी शेतावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला हवे, अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून होत आहे. टोमॅटोला बाजारभाव असला तरी उत्पादन घटल्यामुळे यंदाच्या वर्षी टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सध्या थंडीचे प्रमाण वाढले असून हिरव्या टोमॅटोलादेखील मागणी कमी आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे.