नारायणगाव: वीज कोसळून जखमी झालेल्या दोन बांधकाम मजूर असलेल्या तरुणांपैकी सुनील कोल (वय 26) याने उपचार सुरू असताना येथील मॅक्स केअर हॉस्पिटलच्या दुसर्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही.
ही घटना गुरुवारी (दि. 22) दुपारी 11 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केल्याची माहिती नारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली. (Latest Pune News)
सुनील कोल व अमन राजमान कोल (वय 18) हे तरुण मध्य प्रदेश येथून रोजगारासाठी आले होते. ते 14 नंबर येथे वास्तव्यास होते. सोमवारी (दि. 19) दुपारी 2 वाजेच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरून नारायणगाव येथून 14 नंबर येथे ते घरी जात होते.
या वेळी महामार्गावर वीज कोसळली. या घटनेत सुनील कोल व अमन कोल हे जखमी झाले. त्यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने व त्यांचे कुटुंबीय मध्य प्रदेश येथे असल्याने मानवतेच्या भावनेतून उपसरपंच योगेश पाटे यांनी त्यांना येथील मॅक्सकेअर हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केले.
डॉ. प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिदक्षता विभागात त्यांच्यावर तीन दिवस उपचार करण्यात आले. उपचारानंतर अमन कोल याला घरी सोडण्यात आले; मात्र सुनील कोल याच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान गुरुवारी दुपारी 11 वाजेच्या सुमारास रुग्णालयाच्या दुसर्या मजल्यावरून सुनील याने उडी मारली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, रुग्ण हॉस्पिटलच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या कशी करू शकतो? आत्महत्येमागे वेगळे काही कारण दडले आहे का? याबाबत उलटसुलट चर्चा परिसरामध्ये ऐकायला मिळत आहे.