पुणे

पावणेतीन लाख मतदारांची नावे वगळली; कोथरूड मतदारसंघातील संख्या सर्वाधिक

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे शहरासह जिल्ह्यातील दोन लाख 81 हजार 589 मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. मतदार यादी अद्ययावतीकरण मोहिमेंतर्गत मयत, दुबार मतदारांची नावे वगळण्यात आली. जिल्हा निवडणूक शाखेकडून नुकतीच जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांतील मतदारांची संख्या 78 लाख 76 हजार 950 एवढी झाली आहे.

शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी कोथरूडमधील 49 हजार सर्वाधिक मतदार वगळण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवडमधील तीन मतदारसंघांपैकी पिंपरीतील सर्वाधिक 13 हजार, तर ग्रामीण भागातील दहा मतदारसंघांपैकी खेडमध्ये सर्वाधिक 15 हजार मतदार वगळण्यात आले आहेत. दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रारूप मतदार यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात येते. या मतदार यादीवर हरकती, सूचना मागविल्या जातात. त्यावर सुनावणी घेऊन 5 जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाते.

या कार्यक्रमानुसार सध्या प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदार यादीत नाव नोंदणी, नाव, पत्त्यांमधील दुरुस्ती, एका मतदारसंघातून दुसर्‍या मतदारसंघात नाव नोंदविणे, मतदार यादीतील दुबार आणि मयत नावे वगळणे आदी कामे हाती घेतली जातात. मतदार यादीत नाव आहे किंवा कसे, www. nvsp. in या संकेतस्थळावर किंवा voters helpline या मोबाइल अ‍ॅप संपूर्ण नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ ही माहिती भरल्यानंतर समजेल. मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी अर्ज क्रमांक सहा भरावा, पत्ता बदलण्यासाठी आठ-अ, तर नाव वगळणीसाठी सात क्रमांकाचा अर्ज भरावा, असे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.

विधानसभा मतदारसंघांतील मतदार
मतदारसंघ अगोदरचे सध्याचे
वडगाव शेरी 4,71,010 4,26,797
शिवाजीनगर 2,90,919 2,73,934
कोथरूड 4,34,575 3,85,077
खडकवासला 5,40,572 5,06,521
पर्वती 3,56,212 3,27,926
हडपसर 5,55,910 5,25,174
पुणे कँटोन्मेंट 2,87,535 2,65,095
कसबा पेठ 2,86,057 2,74,377

विधानसभा मतदारसंघांतून वगळलेल्या मतदांरांची संख्या
शहरातील वडगावशेरी मतदारसंघातून 44 हजार 213 मतदार वगळण्यात आले आहेत. शिवाजीनगरमधून 16 हजार 985, कोथरूडमधून 49 हजार 498, खडकवासलामधून 34 हजार 51, पर्वतीमधून 28 हजार 286, हडपसरमधून 30 हजार 736, पुणे कॅन्टोन्मेंटमधून 22 हजार 440, तर कसबा पेठमधून 11 हजार 680 मतदार वगळण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT