सासवड: पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पुरंदर तालुक्यातील भिवडी येथील जन्मस्थळ असलेले आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध सर्वप्रथम बंड पुकारले व इंग्रजांना ‘सळो की पळो’ करून सोडले.
ब्रिटिश सरकारने उमाजी नाईक यांना 3 फेब्रुवारी 1832 या दिवशी खडकमाळ आळी पुणे येथे फाशी दिली. स्वातंत्र्यलढ्यातील हे पहिले बलिदान ठरले म्हणून या विमानतळाला ‘आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव द्यावे, अशी मागणी जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांनी केली.
सासवड येथील छत्रपती श्रीशिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा (शिवतीर्थ), भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, थोर समाजसेवक महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नगरपरिषद चौकातून शिवतीर्थ चौक ते नवीन प्रशासकीय इमारत, असा मोर्चा जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने काढण्यात आला. त्या वेळी शितोळे बोलत होते.
यासंदर्भातील निवेदन निवासी नायब तहसीलदार संदीप पाटील यांना देण्यात आले. राजे उमाजी नाईक यांचे वंशज चंद्रकांत खोमणे, संघटनेचे राज्य अध्यक्ष अंकुश जाधव, सुधीर नाईक, दादासाहेब मदने, किरण खोमणे, नाना मदने, गणेश गावडे, बापू खोमणे, अॅड. विशाल शिरतोडे, महेश जाधव, गणपत शितकल, गंगाराम जाधव, बिट्टू भांडवलकर, अशोक चव्हाण, साहेबराव जाधव, विकास भांडवलकर, अमोल चव्हाण, नीलेश जाधव, खंडू जाधव, नीलेश भांडवलकर, भैया खोमणे, दिलीप चव्हाण उपस्थित होते.
शितोळे म्हणाले, भिवडी हे
आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे जन्मस्थळ आहे. या ऐतिहासिक स्थळापासून प्रस्तावित विमानतळाची जागा केवळ 15 किलोमीटरवर आहे. शिवरायांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून राजे उमाजी नाईकांनी आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन परकीय सत्तेला हादरा दिला. त्यांनी 14 वर्षे इंग्रजांशी लढा देत त्यांना ’सळो की पळो’ करून सोडले; म्हणून या विमानतळाला ‘आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी असल्याचे शितोळे यांनी या वेळी सांगितले.