पुणे

संघर्षातून बेसबॉल स्पर्धेत चमकवले नाव ; मेंढपाळकन्या रेश्मा पुणेकर हिचा प्रेरणादायी प्रवास

अमृता चौगुले

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  लहानपणापासूनच बकर्‍यांमागे काठी घेऊन धावणे, काठीने दगड मारण्याचा खेळ खेळणे, दगड हातात घेऊन पीचींग करणे, हुंदडणे पण त्याच काठीच्या आकाराची स्लगर कधी भारतीय संघाचा खेळाडू नव्हे, तर भारतीय संघाचा कर्णधार बनवेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र, बारामती तालुक्यातील तरडोली येथील रेश्मा शिवाजी पुणेकर हिने मात्र संघर्ष करत बेसबॉल या क्रीडा प्रकारात बारामतीचे नाव पुन्हा एखादा उंचावले आहे.

ही कथा आहे मेंढपाळ कन्येच्या संघर्षाची. या संघर्षाने आजपर्यंत दोन आंतरराष्ट्रीय सामने, चीन आणि हाँगकाँग या देशात खेळले आहेत, तर तब्बल 23 राष्ट्रीय सामन्यांत महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व केलेले आहे. 28 राज्यस्तरीय सामने तसेच 4 सुवर्णपदक, 6 रौप्यपदक, 3 कांस्यपदक आणि महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार प्राप्त केलेला आहे. शेवटचे ध्येय भारतीय संघाचे नेतृत्व करणे, हाँगकाँग आणि चीन या आगळ्यावेगळ्या देशात जाऊन दोन वेळा आशियायी स्पर्धा खेळून आलेली रेश्मा पुन्हा एकदा हाँगकाँगमध्ये होणार्‍या तिसर्‍या आंतरराष्ट्रीय महिला एशियन कप 2023 या स्पर्धेत कर्णधार म्हणून नेतृत्व करणार आहे.

रेश्मा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथे शारीरिक शिक्षण विभागात एम. पी. एड. या वर्गात शिकत आहे. आजही स्पर्धेमध्ये मिळालेले करंडक, मेडल, प्रमाणपत्रे अशा मौल्यवान शिदोर्‍या ठेवण्यासाठी लाकडी कपाटही तिच्याजवळ नाही. ना आधुनिक कोणती उपकरणे साहित्य तिच्या घरामध्ये आहे. आहे तर फक्त दोन जोडी बैल आणि राब-राब राबणारे काळ्या माईच्या उत्पन्नाच्या आशेवर रात्रीचा दिवस करत खपणारे तिचे आई-वडील. मुलीच्या खेळासाठी सगळी बकरी विकली. खेळासाठी शेतसुद्धा विकले; परंतु आजही तिची परिस्थिती काळ बनून तिच्यासमोर उभी आहे. म्हणून तिच्या खेळरूपी पंखांना बळ देण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.
जिद्द, आत्मविश्वास आणि चिकाटीच्या जोरावर ती नक्कीच महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचे नावसुद्धा उंचावेल यात शंका नाही. येणार्‍या काळात आहारासाठी, खेळण्याच्या साहित्यासाठी व इतर लागणारा खर्च तिला पेलवणारा नाही. त्यामुळे समाजातील दानशूरांनी रेश्मा पुणेकरला मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

SCROLL FOR NEXT