कसबा पेठ: पुणे शहराचे श्रद्धास्थान आणि नागपंचमी उत्सवाची 200 वर्षांची जुनी परंपरा असलेले गणेश पेठ आणि रविवार पेठ येथे नागझरीकाठी असलेले दगडी नागोबा देवस्थान सज्ज झाले आहे.
मंगळवारी (दि. 29) होणार्या या पारंपरिक सोहळ्यासाठी दगडी नागोबा परिसरात स्वागत कमानी, मंडळांचे भव्य फलक, मंदिरावर करण्यात आलेली विद्युतरोषणाई आणि आकर्षक फुलांची सजावट, परिसरात उभारण्यात आलेले पाळणे, चक्र, खेळण्यांचे स्टॉल लागले असून, संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे. उत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडावा, यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी सर्व तयारी पूर्ण केली आहे. (Latest Pune News)
नागपंचमीनिमित मंदिरात पहाटे अभिषेक, त्यानंतर नैवेद्य आणि त्यानंतर दिवसभर मंदिर भाविकांसाठी खुले असणार असल्याचे मंदिर विश्वस्तांकडून सांगण्यात आले. नागपंचमीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने पहिल्या श्रावणी सोमवारीच अनेक भाविकांनी दर्शन घेण्याचे पसंत केले.
दगडी नागोबा मंदिराच्या गाभार्यात नाग आणि नागीण यांची दगडी शिल्पे आहेत. या उत्सवाला 200 वर्षांची जुनी परंपरा आहे. पुणेकरांचे श्रद्धास्थान असून, दरवर्षी यादिवशी मूळ पुणेकर आवर्जून दर्शनाला येत असतात.- संतोष कडेकर, मंदिर व्यवस्थापक