ताथवडे; पुढारी वृत्तसेवा : सुदृढ शरीरासाठी व्यायाम आवश्यक असतो. लहान मुलांपासून ते अगदी साठी पार केलेले वृद्ध व्यक्तीही अंगात चपळपणा राहावा म्हणून व्यायाम करतात. आता तर थंडीचे दिवस, या दिवसातला गारवा हा आल्हाददायक असतो. या दिवसात शरीरात उर्जा निर्माण व्हावी, म्हणून नागरिकांची पावले जीम आणि व्यायामशाळेकडे वळली आहेत. ताथवडे आणि पुनावळेतील जीम आणि व्यायामशाळा फुल झाल्या आहेत. सध्या वातातावरणात सकाळ आणि सायंकाळच्या वेळी आल्हाददायक गारवा आहे.
पावसाळ्यात पावसाची संततधार, उन्हाळ्यात अंगातून निघणार्या घामाच्या धारा अशा वातावरणापेक्षा हिवाळ्यातील गुलाबी थंडी सर्वांना हवीहवीशी वाटते. थंडीच्या दिवसांतील वातावरण मन शरीराला आणि मनाला प्रफुल्लित आणि उत्साही ठेवते. हा काळ शारीरिक व्यायाम करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. थंडीत शरीर गारठलेले असते त्यामुळे त्याला ऊबदार राखण्यासाठी व्यायामाची, कसरतीची आवश्यकता असते. या काळात पचनक्षमता अधिक चांगल्या पद्धतीने होत असल्याने भूकही वाढलेली असते.
त्यामुळे व्यायाम आणि आहार यांची योग्य सांगड घालून आरोग्याबाबत नियोजन करण्यासाठी थंडीचा हंगाम योग्य मानला जातो. ताथवडे व पुनावळेगाव नेहमीच कुस्तीप्रिय मानले जाते. या गावांनी अनेक मल्लसम्राट,कुस्तीपटू,चांगले खेळाडू व पैलवान दिलेले आहेत. त्यामुळे सकाळी लवकर उठून व्यायाम, कसरत करण्याची आवड आजही कायम असून तीच आवड आजही जोपासली जात आहे. पिढी बदलली, गावाचा चेहरामोहरा बदलला तशी तालमीची आणि त्यातील मातीची जागा अत्याधुनिक, वातानुकूलित व्यायाम शाळेने घेतली. सध्या ताथवडे व पुनावळेतील व्यायामशाळा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर तरुण तरुणींना ओघ हा जिमकडे असतो. शरीर बळकट आणि मजबूत राखण्यासाठी सर्वजण प्रयत्न करताना दिसतात. येथील पंचक्रोशीत अनेक आयटीजन्स ही राहत असल्याने तेही आपला वेळ जिममध्ये घाम गाळण्यासाठी घालवत आहेत. तरुणांना आकर्षित करण्यासाठी जिम मालकही पुढे सरसावले असून अनेक सवलतीत आकर्षित पॅकेजस देऊन, विशेष जिम प्रशिक्षक नेमत आहेत. त्यामुळे ताथवडे व पुनावळेतील जिम सध्या फुल्ल झालेल्या असून, सकाळच्या वेळी जिम बॅग अडकवून जिमला जाणारे युवक, युवती सर्रास पाहायला मिळत आहेत.
कोणत्याही वातावरणात व्यायाम करणे हे शारीरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. दैनंदिन जीवनात व्यायाम आणि सकस आहार घेतल्याने शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते. शरीरातील कोलेस्ट्रोलचे प्रमाण कमी होऊन शरीर निरोगी आणि सुदृढ बनते.
– डॉ.ऋतुपर्ण कसबे,
ताथवडे