सुवर्णा चव्हाण
पुणे : दुर्मीळ अन् जुन्या वस्तूंच्या खजिन्याचे जतन करणारी पुण्यातील वस्तुसंग्रहालये आता हायटेक बनली आहेत. काळाप्रमाणे बदलत आता संग्रहालये सर्व काही सोशल मीडियाद्वारे पुणेकरांसमोर आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल अॅप अन् फेसबुक-इन्स्टाग्राम पेजद्वारे संग्रहालयांकडून माहिती पोचविली जात आहे. काही संग्रहालयांनी थ्रीडी व्हर्च्युअल टुरचीही व्यवस्था केली आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी संग्रहालयांकडून संकेतस्थळावर रोजची छायाचित्रे आणि व्हिडीओ अपलोड केले जात आहेत.
आकर्षणाचे केंद्र
पुण्यात जवळपास 30 हून अधिक संग्रहालये आहेत. बाजीराव रस्ता, कोथरूड, कॅम्प परिसर, घोले रस्ता आदी वेगवेगळ्या ठिकाणी वस्तुसंग्रहालये असून, येथे नेहमी पर्यटकांची गर्दी असते. जुन्या आणि दुर्मीळ वस्तू, क्रिकेट, भारतीय रेल्वे, दुर्मीळ हस्तलिखिते अशा विषयांशी संबंधित संग्रहालये आहेत. विविध संशोधन संस्था आणि खासगीरीत्या ती चालवली जातात.
तंत्रज्ञानाचा वापर
पर्यटकांना संग्रहालयातील संग्रहित वस्तूंची माहिती मिळावी, यासाठी फेसबुक, इन्स्टाग्रामवर खास व्हिडीओ, रील्स अपलोड केले जात आहेत. संकेतस्थळांवरूनही माहिती पोचविली जात आहे, तर छायाचित्र आणि व्हिडीओतूनही पर्यटकांना संग्रहालयाची भेट घडवली जात आहे. त्यामुळे आता जगभरातील पर्यटक या ठिकाणी पोहचत आहेत.
पुण्यात असलेली काही वस्तुसंग्रहालये…
काळानुरूप संग्रहालयांनी आपल्या कार्यशैलीत बदल घडविणे आवश्यक आहे. आम्ही पर्यटकांसाठी थ—ी-डी व्हर्च्युअल टूरची व्यवस्था केली आहे. त्यासोबत अद्ययावत संकेतस्थळ, मोबाईल अॅप, ऑडिओ गाइड्स, डिजिटल लेबल्ससाठी पुढाकार घेतला आहे. सोशल मीडियाचा वापर पर्यटकांना संग्रहालयभेटीस प्रोत्साहन देण्यासाठी करीत आहोत.
– सुधन्वा रानडे, संचालक,
राजा दिनकर केळकर संग्रहालय