इंदापूर: जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती तसेच सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने यांच्या भारतीय जनता पार्टीत प्रवेशामुळे पक्षाला चालना मिळाली आहे. पक्ष वाढीसाठी प्रवीण माने यांना बळ देणार असल्याची ग्वाही केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
गुरुवारी (दि. 17) केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी प्रवीण माने यांच्या इंदापूर शहरातील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली, या वेळी ते बोलत होते. सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख दशरथ माने यांनी मंत्री मोहोळ यांचा सत्कार केला. (Latest Pune News)
केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, माने यांनी भाजपात प्रवेश केला, त्यांचे स्वागत आहे. त्यांचे सामाजिक काम उल्लेखनीय आहे. त्यांच्यामुळे पक्षाची ताकद वाढली असून योग्य दिशादर्शक पक्षप्रवेश ठरला आहे. आगामी निवडणुकांमध्ये देखील याचा निश्चितच फायदा होणार आहे. माने कुटुंबाने हजारो बेरोजगार, महिलांना विविध उद्योगातून हाताला काम देऊन यातून रोजगारनिर्मिती करीत अनेकांचे प्रपंच उभे केले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व
पुणे जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक पक्षप्रवेश होत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पक्षप्रवेश महत्त्वाचे मानले जात आहेत. जिल्हा परिषदेवर भाजपाची सत्ता आणण्यासाठी मंत्री, पदाधिकारी यांच्या भेटी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.