पुणे

Pimpri Crime News : ओटास्किममध्ये दोघांवर खुनी हल्ला; एकाचा मृत्यू

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : घरासमोर गप्पा मारत थांबलेल्या दोघांवर नऊ जणांच्या टोळक्याने खुनी हल्ला चढवला. यामध्ये एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. 11) सकाळी सव्वादहाच्या सुमारास जीवलग सोसायटी, बिल्डिंग नंबर सात, ओटास्कीम, निगडी येथे घडली.

आकाश गोरख धुनधव (वय 23) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, आनंद ऊर्फ दाद्या राजू गवळी (वय 22) हा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी जखमी आनंदच्या आईने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, काळ्या ऊर्फ शाहिद पठाण, सूरज ऊर्फ डोरेमॉन चंदनशिवे, शाहनवाज ऊर्फ शहाण्या शेख, जावेद शेख, शाहिद शेख आणि इतर चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद गवळी आणि आकाश धुनधव हे दोघेजण बुधवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास घरासमोर गप्पा मारत उभे होते. त्या वेळी आरोपी तेथे आले. आरोपींनी आनंद आणि आकाश यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जीवे मारण्याच्या उद्देशाने दोघांच्या छातीवर, पोटावर चाकू, कोयत्याने सपासप वार केले. त्यानंतर सिमेंटच्या गट्टूने मारहाण करीत घटनस्थळावरून पळ काढला.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आकाश आणि आनंद यांना पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, आकाश याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. तर, आनंद याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. जखमी आनंद याची प्रकृतीदेखील चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिस उपनिरीक्षक कुमार गिरिगोसावी तपास करीत आहेत.

गुन्ह्यात कलमवाढ

घटनेनंतर जखमी आनंद यांच्या आईने फिर्याद दिली. त्यानुसार, खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर काही वेळातच आकाश धुनधव याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर निगडी पोलिसांनी या गुन्ह्यात कलमवाढ केली आहे.

वर्चस्ववादाची लढाई

मृत्यू पावलेल्या तरुणासह जखमी आणि आरोपींवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यात यापूर्वी वाददेखील झाले होते. त्यामुळे ओट्यावरील वर्चस्ववादातून हा हल्ला करण्यात आला असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT