पुणे; पुढारी वृत्तसेवा : आईवरून शिव्या दिल्याच्या रागातून ज्येष्ठ नागरिक असलेल्या मित्राचा डोक्यात फरशीने मारून खून केल्याचा प्रकार पिसोळी येथे घडला. पोलिसांनी काही तासांतच पळून गेलेल्या संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या. हकीमुद्दीन तायरभाई बारोट (वय 62, रा. पिसोळी ग्रामपंचायतीमागे, पिसोळी) असे खून झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. तर याप्रकरणी महेश महादेव ओव्हाळ (वय 32, रा. सिध्दार्थनगर, पिसोळी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत मरियम हकीमुद्दीन बारोट यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारोट आणि अटक आरोपी ओव्हाळ हे दोघे मित्र असून, दोघे मिळून नेहमी दारू पित असतात. 23 एप्रिलच्या रात्री मयूर बांदल यांच्या पिसोळी येथील मोकळ्या जागेत ते दारू पित असताना बारोट यांनी ओव्हाळला आईवरून शिवीगाळ केली. याचाच ओव्हाळला राग आल्याने त्याने शेजारी पडलेली फरशी बारोट यांच्या डोक्यात व उजव्या डोळ्यावर मारून त्यांचा खून केला.
दरम्यान, तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील, अंमलदार सतीश चव्हाण, नीलेश देसाई, गोरखनाथ चिनके, जोतिबा पवार, सुजित मदने, संतोष बनसुडे हे हद्दीत शोध घेत असताना त्यांना बारोट यांचा मित्र ओव्हाळ यानेच खून केल्याची खबर मिळाली. त्यानुसार त्याला सिध्दार्थनगर येथून ताब्यात घेत अटक करण्यात आली. दरम्यान, त्याच्याकडे विचारणा केल्यानंतर शिवीगाळ केल्यानेच खून केल्याचे सांगितले. ही कामगिरी उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक पोलिस आयुक्त पौर्णिमा तावरे, वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे, गुन्हे निरीक्षक संजय मोगले, संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.