पुणे

पुणे : गोडाऊनमध्ये चोरीच्या उद्देशाने सुरक्षारक्षकाचा खून

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : हडपसरमधील फुरसुंगी भागात एका कंपनीच्या गोडाऊनमधील सुरक्षारक्षकाच्या खुनाचा छडा गुन्हे शाखेने लावला. लोखंडी पाइप चोरण्यासाठी आलेल्या तिघा चोरट्यांनी सुरक्षारक्षकाचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. ध्रुवदेव राजेंद्र राय (वय 24), पंकजकुमार सिकंदर राय (वय 22), अजयकुमार लखदेवप्रसाद यादव (वय 24, तिघे सध्या रा. धावडे वस्ती, भोसरी, मूळ रा. बिहार) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, काशीनाथ कृष्णा महाजन (वय 52, मूळ रा. जळगाव) असे खून झालेल्या रखवालदाराचे नाव आहे.

फुरसुंगी भागातील एका गोडाऊनमध्ये महाजन सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होते. गोडाऊनमध्ये लोखंडी पाइप ठेवण्यात आले होते. जळगाव येथील एका कंपनीत कामाला असलेल्या पंकजकुमार राय तेथे माल घेऊन यायचा. त्यामुळे त्याला गोदामात मोठ्या प्रमाणावर लोखंडी माल ठेवल्याची माहिती होती. गोडाऊनच्या परिसरातील एका खोलीत महाजन राहत होते.

मंगळवारी मध्यरात्री आरोपी राय, यादव गोदामाच्या आवारात चोरी करण्यासाठी आले. सुरक्षारक्षक महाजन यांना बेदम मारहाण करून त्यांचा खून केला. त्यांचा मोबाइल, एटीएम कार्ड, रोकड, तसेच लोखंडी पाइप चोरून आरोपी पसार झाले. महाजन मृतावस्थेत सापडल्यानंतर गुन्हे शाखेकडून तपास सुरू करण्यात आला. तपासात मिळालेल्या माहितीनंतर तिघा आरोपींना पकडण्यात आले.

अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (गुन्हे), पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक वैशाली गपाट, प्रमोद टिळेकर, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, अकबर शेख, दया शेगर, राजस शेख आदींनी ही कारवाई केली.

म्हणून काढला काटा..
सुरक्षारक्षक महाजन हे गेल्या बारा वर्षांपासून मोनार्च कंपनीच्या फुरसुंगी येथील गोडाऊनमध्ये काम करीत होते. गोडाऊनमधील एका पत्र्याच्या खोलीमध्येच ते राहत होते. चोरी करताना त्यांनी पाहिले आणि त्यांना सोडले, तर अंगलट येईल म्हणून त्यांनी सुरुवातीला महाजन यांचा बंदोबस्त करण्याचे नियोजन केले. त्यानुसार तिघांनी गोडाऊनच्या पाठीमागील दाराने आत प्रवेश करून महाजन यांची खोली गाठली. त्या वेळी महाजन हे स्वयंपाक करीत होते. तिघांनी त्यांना पकडून जोरात खाटेवर आपटले. त्यानंतर एकाने हात, दुसर्‍याने पाय, तर तिसर्‍याने तोंड बांधून टाकले. त्यामध्ये महाजन यांचा मृत्यू झाला. त्यांच्या खोलीतील चावी घेऊन तिघा आरोपींनी गोडाऊनमधील लोखंडी पाइपांची चोरी केली.

पंकजकुमार ड्रिलर म्हणून करत होता काम
मुख्य सूत्रधार पंकजकुमार राय हा पूर्वी जळगाव येथील मोनार्च कंपनीत ड्रिलर म्हणून काम करीत होता. संबंधित कंपनी ही माती परीक्षण करण्याचे काम करते. त्यामुळे त्याला कंपनीच्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात लोखंड असल्याची माहिती होती. त्यातूनच त्याने आपला नातेवाईक ध्रुवदेव राजेंद्र व मित्र अजयकुमार याच्या साथीने ही लुटीची योजना आखली, अशी माहिती पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिली.

…असा लागला छडा
चोरी केल्यानंतर तिघा आरोपींनी तेथून पळ काढला होता. गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाकडून गुन्ह्याचा समांतर तपास सुरू होता. त्या वेळी तांत्रिक विश्लेषणाद्वारे तिघे आरोपी परिसरात येऊन गेल्याचे पथकाला समजले. दरम्यान, तिघे धावडे वस्ती, भोसरी, पिंपरी-चिंचवड परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तिघांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT