पुणे; पुढारी वृत्तसेवा: जनता वसाहत परिसरात रिक्षाचालकाचा तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. विनोद आल्हाट, अनिकेत नांगरे आणि आकाश देवरुखे, अशी तिघा संशयित आरोपींची नावे आहेत. अक्षय हनुमंत रावडे (वय 26, रा. रायकरनगर, वडगाव धायरी) असे खून झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याबाबत अक्षयचा भाऊ किरण (वय 27) याने दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना शनिवारी (दि. 7) पहाटे अडीच ते साडेतीन वाजताच्या सुमारास घडली.
अक्षय रिक्षाचालक आहे. मध्यरात्री अक्षयचा स्वारगेट परिसरात तिघा आरोपींसोबत वाद झाला होता. आरोपींपैकी दोघे रिक्षाचालक असून, एकमेकांच्या ओळखीचे आहेत. वादावादी झाल्यानंतर अक्षयला तिघे जण जनता वसाहत परिसरात घेऊन गेले. कॅनॉल रस्त्यावर अक्षयवर शस्त्राने वार करून त्याचा खून केला. सहायक पोलीस निरीक्षक युवराज पाटील तपास करीत आहेत.