पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिका शाळांतील प्राथमिक शिक्षकांच्या रखडलेल्या बदल्यांना मुहूर्त सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पिंपरी-चिंचवड कर्मचारी महासंघ आणि शिक्षक संघटना प्रतिनिधींसमवेत गुरुवारी आयुक्त शेखर सिंह यांनी घेतलेल्या बैठकीत शासन निकषानुसार लवकरात लवकर शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना अधिकार्यांना दिल्या आहेत.
महापालिका प्राथमिक शाळांतील शिक्षकांच्या बदल्या गेल्या तीन वर्षांपासून रखडल्या आहेत. काही शाळांमध्ये तर 10 ते 12 वर्षांपासून बदलीपात्र शिक्षक आहेत. प्रशासकीय बदल्यांसाठी तीन वर्षांचा निकष आहे. या निकषानुसार केवळ 30 टक्के बदलीपात्र शिक्षकांची संख्या 300 पेक्षा जास्त आहे.
2018 पासून तत्कालीन आयुक्तांनी परिपत्रक काढून प्रशासकीय बदली प्रक्रिया कशी राबवावी, याचा निर्णय दिलेला आहे. मात्र, प्राथमिक शिक्षण विभागाकडून गेल्या तीन वर्षापासून बदल्यांबाबत परिपत्रक काढण्यात येत आहे. प्रत्यक्षात त्याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. शिक्षण विभागाकडून ही प्रक्रिया राबविली जात नसल्याचे सध्याचे चित्र आहे. शिक्षकांच्या वैयक्तिक अथवा वैद्यकीय कारणास्तव करण्यात येणार्या विनंती बदल्याही सध्या रखडल्या आहेत. गेल्या काही वर्षापासून बदल्यांची प्रक्रिया न झाल्यामुळे अनेक शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
दरम्यान, आयुक्तांसमवेत आज झालेल्या बैठकीला पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे व पदाधिकारी तसेच, महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा (पिंपरी-चिंचवड) शहराध्यक्ष मनोज मराठे, महापालिकेच्या विविध विभागांचे विभागप्रमुख आदी उपस्थित होते.