पुणे

पुणे : पालिकेची ‘स्वच्छ वी-कलेक्ट’ मोहीम; ‘जुन्या वस्तू कचर्‍यात न टाकता गरजूंची दिवाळी गोड करा’

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शहरातील गरजू व गरिबांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी महापालिकेने 'स्वच्छ वी-कलेक्ट' मोहीम राबवीत आहे. या मोहिमेंतर्गत घरातील जुन्या टाकाऊ; परंतु पुनर्वापरात येणार्‍या वस्तूंचे संकलन करून त्या गरजूंना देण्यात येणार आहेत.
दिवाळीनिमित्त होणार्‍या स्वच्छतेमध्ये घरे आणि कार्यालयातील वापराच्या अनेक जुन्या वस्तू कचर्‍यात टाकल्या जातात.

मात्र, यापैकी बहुतांश वस्तूंवर प्रक्रिया होत नसल्याने पर्यावरणाची हानी होते. या पार्श्वभूमीवर महापालिका मागील काही वर्षांपासून वी-कलेक्ट मोहिमेचे आयोजन करीत आहे. मागील वर्षी दिवाळीमध्ये या मोहिमेअंतर्गत 95 टन जुन्या वस्तूंचे संकलन झाले होते. गरजूंना या मोहिमेचा चांगला लाभ झाला. यंदाही 2 ऑक्टोबरपासून क्षेत्रीय कार्यालयस्तरावर ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. वी-कलेक्ट फिरत्या संकलन केंद्राची सविस्तर माहिती https://www.pmc.gov.in/mr/v-collect-drive-2022 या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

या मोहिमेंतर्गत जुने कपडे, पुस्तके, भांडी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, शोभेच्या वस्तूंचे गरजूंना देऊन वस्तूंचा वापर पुनर्निर्माणासाठी केला जाणार आहे. 'दिवाळी आवराआवर' या विशेष मोहिमेअंतर्गत 12 ते 16 ऑक्टोबरदरम्यान संपूर्ण शहरात क्षेत्रीय कार्यालयांमार्फत उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT