पुणे

पुणे : महापालिका करणार 100 माजी सैनिकांची नियुक्ती

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेकडून केल्या जाणार्‍या विविध कारवायांवेळी पोलिसांकडून मिळणारा तुटपुंजा बंदोबस्त लक्षात घेऊन महापालिका 100 माजी सैनिकांची सुरक्षारक्षक या पदावर नेमणूक करणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तो लवकरच राज्य सुरक्षा महामंडळाला देण्यात येणार असल्याची माहिती महापालिका अधिकार्‍यांनी दिली.

महापालिकेच्या अतिक्रमण आणि बांधकाम विभागाकडून शहरातील अवैध बांधकामे, पदपथांवरील अतिक्रमणे, अनधिकृत पथविक्रेते, बोर्ड, वाहने आदींवर कारवाई केली जाते. कारवाई चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आणि कर्मचार्‍यांच्या सुरक्षेचा भाग म्हणून कारवाईवेळी पोलिस आणि महापालिकेच्या सुरक्षारक्षकांचा बंदोबस्त घेतला जातो.

अनेकवेळा कारवाईला नागरिकांचा आणि व्यावसायिकांचा विरोध असतो. कारवाई पथकांवर दगडफेक करणे, कर्मचार्‍यांना मारहाण करणे, असे प्रकार घडतात. अशावेळी पालिका प्रशासनाला पोलिस बंदोबस्त मिळत नाही. मिळालाच, तर मागणीपेक्षा कमी मिळतो. नुकतेच अतिक्रमणाविरुद्ध कारवाई करण्यास गेलेल्या महापालिकेच्या सहायक निरीक्षकांसह सुरक्षारक्षकाला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली.

या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये ज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्याकडून सेवा घेण्यात आली आहे, त्याच धर्तीवर पुणे महापालिकाही फिटनेस उत्तम असलेल्या 100 माजी सैनिकांची सुरक्षारक्षक म्हणून नेमणूक करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला असून, तो लवकरच महामंडळाला दिला जाणार आहे.

SCROLL FOR NEXT