पुणे; पुढारी वृत्तसेवा: महापालिकेने शालेय विद्यार्थ्यांना घराजवळील शाळांमध्ये सुरक्षितरीत्या चालत अथवा सायकलवर जाता यावे, यासाठी महापालिका सरसावली आहे. याचाच एक भाग म्हणून महापालिकेने 'सेफ स्कूल' या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी शहरातील सात झोनमधून आठ स्पर्धकांनी त्यांच्या संकल्पना महापालिकेकडे सादर केल्या असून, शुक्रवारी या संकल्पनेचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना शाळांमध्ये सुरक्षितरीत्या चालत अथवा सायकलवर जाता यावे, यासाठी 'सेफ स्कूल' ही स्पर्धा आयोजित केली आहे. रोड सेफ्टीवर आधारित प्रोजेक्टची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
तीन संकल्पनांची निवड केली जाणार असून, डिसेंबरमध्ये त्याची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे ट्रॅफिक प्लॅनर निखिल मिजार यांनी दिली. शुक्रवारी या प्रोजेक्टचे अधिकार्यांसमोर सादरीकरण करण्यात येणार आहे. यातून तीन अंतिम प्रोजेक्ट निवडले जाणार असून, त्यांना बक्षीसही दिले जाणार आहे. अंतिम तीन स्पर्धकांच्या प्रोजेक्टची डिसेंबरमध्ये संबंधित झोनमध्ये प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन आणि स्थानिक नागरिकांनाही सहभागी करून घेतले जाईल. त्यांच्याही सूचना घेऊन अंतिम प्रोजेक्ट तयार करून त्याची 'सेफ स्कूल' या उपक्रमांतर्गत अंमलबजावणी करण्यात येईल, असे मिजार यांनी नमूद केले.
प्रगत देशांच्या धर्तीवर झोन…
पर्यावरणदृष्ट्या वाहनांचा वापर मर्यादित व्हावा, यासाठी शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना पायी अथवा सायकलवर शाळेत जाता यावे, यासाठी सुरक्षित रस्ते, पदपथ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. प्रगत देशांमध्ये विद्यार्थ्यांसाठी असे झोन करण्यात आले आहेत. या संकल्पनेवर आधारित उपक्रम पुण्यातही राबविण्यासाठी महापालिकेने शहराचे शाळाबहुल भागातील 9 झोन तयार करून वाहतुकीच्या दृष्टीने 'सेफ स्कूल' या संकल्पनेवर आधारित स्पर्धा आयोजित केली होती.
झोनची निवड अशी केली
शाळांची संख्या आणि त्या परिसरातील विद्यार्थ्यांची घनता, अस्तित्वातील रस्ते, पदपथ यांचा विचार करून स्पर्धेसाठी झोन निश्चित करण्यात आले.
या झोनमधून प्रस्ताव आले
खराडी, लोहगाव-धानोरी, कोंढवा, पर्वती-बिबवेवाडी, वडगाव बुद्रुक, कोथरूड, डेक्कन जिमखाना-शिवाजीनगर. (पाषाण आणि हडपसर झोनमधून एकही प्रोजेक्ट आला नाही.)