पुणे

Pune Pmc News : पालिकेला तज्ज्ञ डॉक्टर अन् कर्मचारी मिळेना!

अमृता चौगुले

पुणे : सर्वसामान्यांची आरोग्य व्यवस्था अवलंबून असलेल्या पुणे महापालिकेला तज्ज्ञ डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारीच मिळत नसल्याची गंभीरबाब समोर आली आहे. तज्ज्ञ डॉक्टर, सर्जन, वैद्यकीय अधिकारी आणि नर्सिंग कर्मचारी अशा आरोग्य खात्यातील मंजूर पदांची संख्या 2 हजार 67 इतकी आहे. प्रत्यक्षात मात्र कार्यरत असलेल्या तज्ज्ञ आणि कर्मचारी यांची संख्या फक्त 1 हजार 68 इतकी आहे. त्यामुळे तब्बल 1 हजार जागा रिक्तच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरात महापालिकेची दोन रुग्णालय, 20 प्रसूतिगृह, जवळपास 60 दवाखाने, माता बालसंगोपन केंद्र, कुटुंब नियोजन केंद्र याशिवाय लसीकरण केंद्र अशी आरोग्याची मोठी यंत्रणा आहे. प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेला वर्ग याच आरोग्य व्यवस्थेवर अवलंबून आहे. या सर्व आरोग्य यंत्रणेसाठी महापालिकेला राज्य शासनाकडून प्रथम श्रेणीतील तज्ज्ञ डॉक्टरांपासून अगदी चतुर्थ श्रेणीतील कर्मचार्‍यांपर्यंत असा एकूण 2 हजार 67 इतकी पदे मंजूर आहेत. मात्र, त्यामधील सद्यस्थितीला केवळ 1 हजार 86 इतकाच कर्मचारीवर्ग कार्यरत आहे.

उर्वरित जवळपास 1 हजार कर्मचार्‍यांची पदे रिक्त असल्याची माहिती महापालिकेकडूनच देण्यात आली आहे. धक्कादायकबाब म्हणजे या रिक्त पदांच्या भरतीसाठी महापालिकेने यामधील महत्त्वाच्या आणि आवश्यक पदांसाठी यापूर्वी जाहिरात देऊन भरती प्रक्रिया राबविली आहे. मात्र, तरीही संबंधित आवश्यक असलेल्या पात्र पदांचे कर्मचारी भरतीसाठी पुढे आलेले नाहीत.

त्यामुळे ही पदे रिक्तच असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्याचा फटका आरोग्यातील अनेक विभागांना सहन करावा लागत असून, नागरिकांना आवश्यक असलेल्या आरोग्य सुविधा महापालिकेला त्यामुळे देता येत नाहीत. त्यामुळे नाइलाजास्त सर्वसामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयांची वाट धरावी लागत आहे. त्याचा भार शहरी गरीब योजनेच्या माध्यमातून महापालिकेवर पडत आहे.

रिक्त पदांची ही आहेत कारणे

महापालिकेकडून दिले जाणारे वेतन आणि या डॉक्टरांना प्रत्यक्षात बाहेरील रुग्णालयांमध्ये मिळणारे वेतन यात मोठी तफावत आहे. त्यामुळे असे तज्ज्ञ डॉक्टर खासगी रुग्णालयांना पसंती देतात. याशिवाय त्यांना खासगी प्रॅक्टिस करण्यास मुभा मिळते. महापालिकेच्या सेवेत ते शक्य होत नाही. त्यामुळे पालिकेच्या सेवेत हे डॉक्टर येत नाहीत, असे सांगण्यात आले.

या प्रमुख पदांची वानवा

आरोग्य विभागात प्रामुख्याने स्पेशालिस्ट डॉक्टर, शल्यचिकित्सक, फिजिशियन, भुलतज्ज्ञ, सर्व प्रकारचे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, मेडिकल सोशल वर्कर, वॉर्ड बॉय अशी प्रमुख पदे रिक्त आहेत.

रिक्त पदांचा तक्ता

श्रेणी पदे कार्यरत रिक्त
1    142    39    103
2     262  169    93
3   1046 580   466
4    617  280   367

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT