पुणे

…मग झाडांची संख्या कमी झाली कशी? आकुर्डीतील एकही झाड न तोडल्याचा पालिकेचा दावा

अमृता चौगुले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्यावतीने चालू वर्षाम आकुर्डी येथे रेल्वे लोहमार्गालगतच्या जागेत बांधलेल्या इको जॉगिंग ट्रॅकसाठी एकही झाड न तोडता ट्रॅक उभारल्याचा दावा केला आहे. मात्र, येथील झाडे तोडली नाही तर कमी झाली कशी, असा सवाल पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे.

आकुर्डी रेल्वे स्थानकालगत लोहमार्गाला समांतर इको जॉगिंग ट्रॅक उभारण्यात आला आहे. आकुर्डीतील पीएमआरडीए कार्यालयाजवळ हा ट्रॅक आहे. रेल्वे आणि महापालिका प्रशासनाच्या अखत्यारीतील जागेवर हा जॉगिंग ट्रॅक बनविण्यात आला आहे. येथील जागेत चार वर्षांपूर्वी हिरवाई पाहण्यास मिळत होती. येथे झाडेही मोठ्या प्रमाणात होती.

तथापि, येथील जागेमध्ये नागरिकांकडून राडारोडा टाकला जात असल्याने येथील जागेचा विकास करण्याची संकल्पना पुढे आली. या संकल्पनेतून आणि चांगल्या उद्देशाने हा जॉगिंग ट्रॅक तयार झाला असला तरी या ट्रॅकशेजारी सध्या खूप कमी झाडे पाहण्यास मिळत आहेत. महापालिका प्रशासनाने येथील झाडे जगविणे गरजेचे होते, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.

हरित पट्ट्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष
महापालिकेने 1995 मध्ये तयार केलेल्या विकास आराखड्यानुसार हरित पट्ट्याची अंमलबजावणी करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. शहरात एका व्यक्तिमागे किमान 4 झाडे असावीत, या नियमाला तिलांजली देण्यात आली आहे. प्राधिकरण परिसरातील उद्यानांचे जतन, संवर्धन करणे गरजेचे असताना अशा प्रकारे जॉगिंग ट्रॅक करणे चुकीचे ठरले आहे. या जॉगिंग ट्रॅकवर सकाळी नागरिक फिरण्यासाठी येतात.

मात्र, येथे पथदिवे बसविले नसल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना येथे फिरता येत नाही. त्याचा चुकीच्या कारणांसाठी वापर होतो. आकुर्डी रेल्वे स्थानकाला समांतर मोकळ्या जागेत हरितपट्टा विकसित करणे गरजेचे होते. त्याचा तरी नागरिकांना उपयोग झाला असता, असे प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी 'पुढारी'शी बोलताना स्पष्ट केले.

आकुर्डी येथील रेल्वे लोहमार्गाशेजारी असलेल्या मोकळ्या जागेत फुललेल्या बहाव्याचे 13 मार्च 2019 रोजी विजय पाटील यांनी टिपलेले छायाचित्र.

महापालिकेच्या वतीने आकुर्डी येथे विकसित करण्यात आलेल्या इको जॉगिंग ट्रॅकसाठी एकही झाड तोडण्यात आलेले नाही. स्थापत्य उद्यान विभागामार्फत येथे ट्रॅक विकसित करण्याचे काम झाले आहे.

                          – गोरख गोसावी, उद्यान अधीक्षक, महापालिका.

महापालिकेच्या वतीने आकुर्डी येथे इको जॉगिंग ट्रॅक तयार करण्यासाठी झाडे तोडण्याची गरज पडली नाही. येथील पूर्ण जागेचे सपाटीकरण करण्यात आले आहे. तसेच, वाढलेले गवत काढण्यात आले आहे.

                             – देवेंद्र बोरावके, उप-अभियंता, महापालिका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT