महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक लागले कामाला! कोथरूड परिसरातील चित्र Pudhari
पुणे

महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक लागले कामाला! कोथरूड परिसरातील चित्र

महायुती आणि महाआघाडीत चुरस होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

Pune News: लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोथरूड परिसरात काही इच्छुकांनी निवडणुकीची तयारीही सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे.

राज्यात आता नवीन सरकार स्थापन झाले असून, महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग चारचा राहील की दोनचा, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. आगामी निवडणूक लक्षात घेऊन कोथरूड परिसरातील विविध पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी आणि कार्यकर्त्यांनी जनसंपर्क कार्यलये सुरू केली असून, विविध सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येत आहे.

2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत चारचा प्रभाग होता. पौड रोड परिसरातील रामबाग कॉलनी-शिवतीर्थनगर प्रभागात (क्र. 11) शिक्षकनगर, परमहंसनगर, भुसारी कॉलनी या प्रभाग 10 मधील भागांचा समावेश होता.

कोथरूड विधानसभा मतदारसंघातून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीला मताधिक्य मिळाले असले, तरी काही प्रभागांत महाआघाडीचा प्रभाव पाहता आगामी महापालिका निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महापालिका निवडणुकीत कोणत्या पक्षाकडून कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महापालिकेच्या 2017 मधील निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11 मधून राष्ट्रवादी काँग्रेस 1, भाजप 1आणि काँग्रेसचे 2 नगरसेवक निवडून आले होते. प्रभाग क्रमांक 10 मध्ये चारही नगरसेवक भाजपचे निवडून झाले होते. आगामी निवडणुकीत पक्षाकडून गेल्या टर्ममधील नगरसेवकांना पुन्हा तिकीट मिळणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. तसेच, प्रभागरचनेबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

निवडणूक लवकर होण्याची अपेक्षा

सामान्य नागरिक प्रत्येक वेळी प्रशासनाकडे जाऊन तक्रार दाखल करू शकत नाहीत. तसेच, प्रशासनावर देखील काही मर्यादा आहेत. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी महापालिकेत मांडण्यासाठी लोकप्रतिनिधींची उणीव सध्या जाणवत आहे. महापालिका निवडणुका लवकरात लवकर होण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

लोकप्रतिनिधींअभावी विकासाला खीळ?

  • लोकप्रतिनिधी नसल्याने प्रभागांत ठोस विकासकामांचा अभाव

  • विविध विकासकामे अर्धवट असल्याने प्रशासनावर नागरिकांची नाराजी.

  • समस्या महापालिकेत मांडण्यासाठी लोकप्रतिनिधी नसल्याने नागरिकांची गैरसोय

  • लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासनावर अंकुश नसल्याचे चित्र

  • पाणीपुरवठा, रस्ते, कचरा आदी मूलभूत सुविधांअभावी नागरिक त्रस्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT