पुणे: पुणे महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना अखेर दिलासा मिळाला आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिवाळीपूर्वी सर्व कंत्राटी कामगारांना 8.33 टक्के बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच राष्ट्रीय सणांच्या दिवशी सुटी, वार्षिक पगारी रजा, तसेच पगार वेळेत देण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
विशेष म्हणजे, ठेकेदार बदलला तरी कामगार बदलू नये, या संघटनेच्या मागणीला तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय, काही सुरक्षा विभागातील कर्मचार्यांना सलग पाच महिने पगार न मिळाल्याच्या तक्रारींची चौकशी करून तत्काळ पगार देण्याचे आदेशही दिले आहेत. (Latest Pune News)
पुढे अशा प्रकारच्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी काटेकोर उपाययोजना करण्याचे निर्देश आयुक्तांनी अधिकार्यांना दिले. तसेच, सर्व कंत्राटी कामगारांना दर महिन्याला पगार स्लिप देणे अनिवार्य केले आहे.
महापालिकेच्या विविध खात्यांमध्ये जवळपास साडेदहा हजार कंत्राटी कामगार काम करतात. अनेक वर्षांपासून या कामगारांना बोनस, पगारी रजा, राष्ट्रीय सणांच्या सुट्या यांचा कायदेशीर लाभ मिळावा, अशी मागणी राष्ट्रीय मजदूर संघाकडून केली जात होती. या मागण्यांसाठी सहा वर्षांपासून सतत आंदोलने, निवेदने आणि उपोषणे करण्यात आली.
कामगार नेते सुनील शिंदे यांनी यासाठी तीन दिवस आमरण उपोषणही केले होते. मात्र, आतापर्यंत महापालिकेच्या आश्वासनांवरच कामगारांची बोळवण होत होती. मागील आठवड्यात स्वारगेट येथील अण्णा भाऊ साठे पुतळ्यापासून महापालिकेच्या गेटपर्यंत मोर्चा काढला होता. त्यावेळी आयुक्तांशी तातडीची बैठक घेण्याची मागणी केली होती.
त्यानुसार, 19 ऑगस्ट रोजी सकाळी महापालिकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत या सर्व मागण्यांवर निर्णय घेण्यात आला. या वेळी आयुक्तांसोबत अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर कामगार संघटनेकडून अध्यक्ष सुनील शिंदे, उपाध्यक्ष सीताराम चव्हाण, संघटक विशाल बागूल आणि बाबा कांबळे आदी मान्यवर सहभागी झाले होते.