Municipal budget was presented before the standing committee in the absence of the commissioner 
पुणे

आयुक्तांच्या गैरहजेरीत स्थायी समितीसमोर सादर झाला महापालिका अर्थसंकल्प

backup backup

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कोरोना महामारीमुळे उत्पन्न घटल्याने यंदा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन 2022-23 च्या अर्थसंकल्पात नवे प्रकल्प, योजनांना तसेच, मोठ्या खर्चीक कामांना कात्री लावण्यात आली आहे.

मूळ 4 हजार 961 कोटी 65 लाखांचा आणि केंद्र व राज्य शासनाचे अनुदान धरू एकूण 6 हजार 497 कोटी 2 लाखांचा अर्थसंकल्प आयुक्तांच्या गैरहजेरीत स्थायी समितीकडे शुक्रवारी (दि.18) सादर करण्यात आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एकूण 623 कोटी 13 लाखांची घट आहे.

स्थायी समितीच्या ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी समिती अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे होते.

आयुक्त राजेश पाटील गैरहजर असल्याने अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी अध्यक्ष लांडगे यांच्याकडे अर्थसंकल्प पुस्तिका सादर केली. या वेळी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, समितीचे सदस्य उपस्थित होते.

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे महापालिकेचे उत्पन्न कमी झाले आहे. सन 2021-22 या वर्षांतील सर्व तरतूद खर्च झाल्याने मोठी शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 623 कोटी 13 लाखांची घट आहे.

गेल्या वर्षीचा मूळ अर्थसंकल्प 5 हजार 588 कोटी 78 लाखांचा आणि आरंभीची शिल्‍लक तब्बल 625 कोटी 10 लाख होती. यंदा तो 4 हजार 961 कोटी 65 लाख इतका कमी आहे. तर, शिल्‍लक केवळ 5 कोटी 9 लाख आहे.

परिणामी, नवीन प्रकल्प व योजनांना यंदा कात्री लावण्यात आली आहे. आहे ती कामे पूर्ण करण्यावर भर दिला आहे. सभा बुधवारी (दि.23) सकाळी 11.30 पर्यंत तहकूब केली आहे. आयुक्त उपस्थित नसल्याबद्दल अध्यक्ष लांडगे यांनी नाराजी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT