पुणे

तळेगाव दाभाडे : टोल वसुलीविरोधात तातडीच्या सुनावणी आधी 3 लाख अनामत भरण्याचे निर्देश

अमृता चौगुले

तळेगाव दाभाडे, पुढारी वृत्तसेवा: मुंबई-पुणे-बंगळूर या जुन्या महामार्गावरील सोमाटणे येथील टोलवसुलीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्या याचिकेवर मंगळवारी पार पडलेल्या प्राथमिक सुनावणीनंतर हायकोर्टाने तातडीच्या सुनावणीकरिता याचिकाकर्त्यांना सुनावणीआधी 3 लाख रुपये अनामत रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले असल्याने याचिकाकर्त्यांना पुढील निकाल लवकर लागेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

राष्ट्रीय महामार्गाच्या दोन टोल प्लाझांमधील किमान अंतराच्या 60 किलोमीटरच्या नियमाचे यात उल्लंघन केल्याचा आरोप याचिकेतून केलेला आहे. वरसोली टोल प्लाझा (लोणावळा) आणि सोमाटणे (देहूरोड) टोल प्लाझामधील अंतर फक्त 31 किमी एवढंच आहे. तसेच सोमाटणे टोल प्लाझा तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या लिंब फाट्यापासून अवघ्या 3.5 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे सोमाटणे येथील टोलवसुली ही मनमानी आणि बेकायदेशीर असल्याचे घोषित करावी, अशी मागणी करत ही याचिका तळेगाव येथील मिलिंद अच्युत आणि अविनाश बोडके यांनी दाखल केली आहे. हायकोर्टाने त्यांना दोन आठवड्यांत 3 लाख रुपये न्यायालयात अनामत रक्कम म्हणून जमा करण्याचे निर्देश देत पुढील सुनावणी 14 नोव्हेंबरला होणार आहे.

SCROLL FOR NEXT