दिगंबर दराडे
पुणे : पुरंदरला आंतरराष्ट्रीय विमानतळ होत असल्याने पुरंदर परिसरात मुंबई, पुण्यातील बड्या मंडळींनी शासकीय दराने व्यवहार दाखवत जमिनींची खरेदी करून काळ्याचे पांढरे केल्याचे वास्तव समोर आले आहे. पुरंदरला विमानतळ जाहीर झाल्यानंतर सात गावांमध्ये मोठ्या प्रमाणात जमीन खरेदीचे व्यवहार झाले आहेत.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव मेमाणे या सात गावांमध्ये सुमारे तीन हजार 265 सर्व्हे क्रमांक आहेत. त्यामध्ये दोन हजार 673 हेक्टर 972 आर एवढी जमीन आहे. मागील दोन वर्षांत विमानतळ होणार म्हणून घोषणा झाल्याने या ठिकाणी मुंबई, पुणे या परिसरातील बड्या मंडळींनी मोठी गुंतवणूक केली आहे. या परिसरातील जमिनीचे दर गगनाला भिडले आहेत. (Pune Pudhari Update)
बाजारभावानुसार 75 ते 85 लाखांपर्यंत एकरी व्यवहार झाले आहेत. या ठिकाणी असलेला रेडीरेकनरचा दर बाजारभावाच्या तुलनेत कमी आहे. सध्या जिरायतीला सरासरी 15 लाख ते 20 लाख रुपये, तर बागायतीला 20 ते 22 लाख रुपयांचा दर आहे. मात्र, गुंतवणूकदारांनी या ठिकाणी मोठ्या रकमेच्या दराने जमिनी खरेदी केल्या आहेत.
विमानतळाचा परतावा मिळताना यापेक्षा अधिकची रक्कम मिळणार असल्याने काळ्या पैशांची गुंतवणूक थेट व्हाईटमध्ये मिळणार आहे. करोडो रुपयांचा मोबदला मिळणार असल्याने गुंतवणूकदारांना फायदेशीर ठरणार आहे.
जमिनीची एकूण माहिती : या गावांमध्ये 3,265 सर्व्हे नंबर असून, एकूण 2,673 हेक्टर 972 आर जमीन
दरवाढ : जमिनींचा रेडीरेकनर दर तुलनेत कमी असून, व्यवहार 75 ते 85 लाख रुपये एकरांपर्यंत झाले. जिरायतीसाठी 15-20 लाख, बागायतीसाठी 20-22 लाखांचा शासकीय दर आहे
शासन महसूल : गेल्या दोन वर्षांत सरासरी 10-11 हजार खरेदीखत नोंद झाली असून, शासनाला 60 कोटी रुपये महसूल मिळाला.
गुंतवणूकदारांचा फायद्याचा व्यवहार : विमानतळामुळे जमिनींची किंमत वाढून मोठा परतावा मिळण्याची अपेक्षा.