‘दररोज घराबाहेर पडले नाही, तर पोटाला खायला मिळत नाही. यंदाचा पावसाळा जरा जास्त असल्यानं आमच्या घराचे पत्रे खराब झाल्यानं सगळ्या घरात पाणी गळत होतं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशांतून आम्ही ताडपत्री घेतली आणि घरावर ती अंथरली,’ शास्त्रीनगरमधील सिंधू कंडीलवार सांगत होत्या. तर स्वाती देशकर यांनी, सासू-सासर्यांच्या, तर शारदा पवार यांनी मुलीच्या औषधांसाठी पैसे खर्च केले आहेत.
महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, स्वावलंबीकरण, आत्मनिर्भर करण्याबरोबरच महिलांच्या सशक्तीकरणाला चालना देण्याकरिता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे दोन महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये महिलांच्या खात्यावर शासनाकडून वर्ग करण्यात येत आहेत. ज्या महिलांना पैसे मिळाले अशा 103 महिलांशी दै. ‘पुढारी’च्या प्रतिनिधींनी संवाद साधून मिळालेले पैशांचा विनियोग कशाप्रकारे केला, हे जाणून घेतले.
त्यामध्ये सर्वाधिक जळपास 40 टक्के महिलांनी शिक्षण आणि घरखर्चासाठी पैसे वापरणार असल्याचे सांगितले. काही महिलांनी मुला-मुलींच्या शिक्षणावर पैसे खर्च करणार सांगितले. काही महिलांनी संगणक शिकण्याची इच्छा होती, ती मी आता पूर्ण करणार असल्याचीही भावना व्यक्त केली.
मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बहिणींना रक्षाबंधणाची ओवाळणी दिल्याचे सांगितले होते. ओवाळणी हातात मिळाल्यानंतर सुमारे पंधरा टक्के महिलांनी रक्षाबंधणासाठी साडी, कपड्यावर पैसे खर्च केले आहेत. गोकूळनगर पठार येथील आशा घोडके म्हणाल्या, गेली पाच वर्षे मी माझ्या माहेरी अमरावतीला गेले नव्हते. मी यावर्षी माहेरी जाऊन सर्व परिवारासोबत रक्षाबंधन साजरे केले. तर अकरा टक्के महिलांनी पैसे बचत करणार असल्याचे सांगितले. ‘आता दर महिन्याला मी योजनेतील सर्व पैशांची गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. दर महिन्याला दीड हजार रुपयांची एसआयपी (म्युच्युअल फंड)मध्ये गुंतवणार आहे. पाच वर्षांनी मोठी रक्कम मिळू शकेल,’ असे रूपाली कागले यांनी सांगितले. तर एका महिलेने ‘सोन्याची भिशी सुरू करणार,’ असल्याचे सांगितले.
बँक खात्यावर पैसे आले, पण आम्हाला मिळाले नाहीत. खाते क्रमांक दिला एक अन् पैसे पाठवले दुसर्या वापर नसलेल्या बँकेच्या खात्यावर. बँकांनी चार्जेस लावून त्या खात्यावरील पैसे कापले. आम्ही या प्रकाराने नाराज आहोत.नंदा वीर
बँकांनी वापरात नसलेल्या खात्यावर कमीत कमी रक्कम नसल्याने, तसेच इतर कारणांवरून योजनेचे पैसे जमा झाल्यानंतर महिलांचे पैसे कापून घेण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे बँकांनी पैसे कापून घेऊ नयेत म्हणून राज्याच्या मुख्य सचिवांनी सूचना करूनदेखील अद्याप प्रश्न सुटलेला नसल्याचे महिलांना बँकेत आलेल्या अनुभवावरून दिसून येत आहे.