एमटीडीसी Pudhari
पुणे

MTDC : एमटीडीसी पर्यटकांना देणार दीपोत्सवाची अनोखी पर्वणी

जास्तीतजास्त पर्यटक पर्यटनासाठी यावेत यासाठी महामंडळाने विशेष सवलती जाहीर केल्या

शिवाजी शिंदे

दिवाळीच्या सुटीत पर्यटकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी एमटीडीसी सज्ज झाले असून, पर्यटकांसाठी पर्यटनाची शाही मेजवानीच ठरणार आहे. त्यामुळे महामंडळाची पर्यटक निवासे आतापासूनच पर्यटकांच्या गर्दीने फुलू लागली आहेत. जास्तीतजास्त पर्यटक पर्यटनासाठी यावेत यासाठी महामंडळाने विशेष सवलती जाहीर केल्या आहेत.

यावर्षी दिवाळीनिमित्त नागरिकांना भरपूर सुट्या मिळणार आहेत. अशातच गुलाबी थंडीची चाहूल लागल्याने पर्यटकांची पावले आपोआप थंड हवेची ठिकाणे आणि निसर्गाकडे वळत आहेत. महाराष्ट्रतूनच नव्हे, तर देशभरातून असंख्य अतिथी पर्यटक निवासामध्ये वास्तव्यास येत असतात. पर्यटक केंद्रस्थानी ठेवून ’अतिथी देवो भव’ या नात्याने पर्यटकांना नेहमीच सर्वोत्तम सुविधा दिल्यामुळे महामंडळास पर्यटकांनीही भरघोस प्रतिसाद मिळत आहे. अद्ययावत करण्यात आलेले संकेतस्थळ, ज्येष्ठ नागरिक, शासकीय कर्मचारी, आजी आणि माजी सैनिक यांच्यासाठी दिलेल्या विशेष सवलती, प्रशिक्षित कर्मचारीवर्ग यांमुळे पर्यटकांचा दीपावलीचा आनंद नक्कीच द्विगुणीत होणार आहे.

अशा आहेत सवलती

महामंडळाने पर्यटकांसाठी अनोख्या सवलती जाहीर केल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी 20 टक्के, शासकीय कर्मचार्‍यांना आगाऊ बुकिंगसाठी 10 ते 20 टक्के सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. सामाजिक बांधिलकी जपताना आजी - माजी सैनिक आणि अपंगांसाठी विशेष सवलती दिल्या आहेत. ग्रुप बुकिंगसाठी 20 खोल्यांपेक्षा जास्त बुकिंग असल्यास सवलत देण्यात येत आहेत. शालेय सहलींसाठी विशेष सवलती देण्यात येत आहेत. तसेच काही नावीन्यपूर्ण निर्णय घेताना महामंडळानेही पर्यटकांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी निवडक ठिकाणी वाय-फाय सुविधा सुरू केली आहे.

महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा, महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती जपत, तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आध्यात्मिक वारसा, तर जंगल सफारीतून साहसी अनुभव अशा अनेक पैलूंचा आणि निवांत समुद्रकिनारे व मोहक पर्वतरांगांमधील शांतता अनुभवण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पर्यटकांना साद घालीत आहे. - दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ

राज्यात या पर्यटनस्थळांना भेट द्या

जागतिक वारसा स्थळे आणि किल्ले -

  • अजंठा, वेरूळ, दौलताबाद, बिबी का मकबरा, राजगड, रायगड, जंजिरा, सिंधुदुर्ग.

  • समुद्रकिनारे - गणपतीपुळे, दिवेआगार, वेळणेश्वर, हरीहरेश्वर, तारकर्ली..

  • अभयारण्ये - ताडोबा, नवेगाव, चिखलदरा, राधानगरी..

  • हिल स्टेशन - महाबळेश्वर, माथेरान, भंडारदरा, लोणावळा

सोयी - सुविधा

पर्यटकांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देताना शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करीत उपाहारगृह, रिझॉर्ट आणि अनुषंगिक बाबींची तसेच परिसराची काटेकारेपणे स्वच्छता आणि पर्यटकांना त्याच्या खोल्यांपर्यंत (काही अपवाद वगळता) अल्पोपाहार, जेवण आणि अन्य अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत.

दीपोत्सव

पर्यटनाची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील अजंठा, वेरूळ आणि लोणार या ठिकाणी पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी आगाऊ आरक्षण झाले आहे, महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये आणि जागतिक वारसा स्थळांच्या सानिध्यात दीपोत्सव साजरा करण्याचे आणि त्या निमित्ताने पर्यटकांना आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविण्याचा महामंडळाचा मनोदय आहे. त्यानुसार दीपावली आणि दीपोत्सव साजरा करण्याच्या सूचना व्यवस्थापकिय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांनी दिल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT