पुणे

पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी एमटीडीसी गेस्टहाऊस फुल्ल

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी, तसेच नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांनी मनसोक्त फिरण्याचे नियोजन केले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या राज्यातील सर्व निवासस्थानांमधील 90 टक्के खोल्या हाऊसफुल्ल झाल्या आहेत. पुणे, औरंगाबाद, कोकण अशा विविध विभागांतील महामंडळाच्या निवासस्थानांना पर्यटकांनी पसंती दर्शवली आहे.
नाताळनिमित्त शाळांना सुट्या असतात. याशिवाय, सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत केले जाते.

विशेषतः निसर्गरम्य ठिकाणी जाऊन उत्साही वातावरणात कुटुंबीयांसमवेत आनंद साजरा करण्यावर भर असतो. पर्यटन महामंडळाची बहुतांश निवासस्थाने निसर्गरम्य ठिकाणी आहेत. तसेच, गेल्या वर्षीप्रमाणे यंदा कोरोनाबाबत कोणतेही निर्बंध नसल्याने मोकळ्या वातावरणात आनंद साजरा करण्यासाठी पर्यटकांनी निवासस्थानांमधील खोल्यांचे आरक्षण केले आहे. या वर्षी पाऊस चांगला झाल्याने घाटमाथ्यावरील निसर्गरम्य ठिकाणी धबधबे वाहत आहेत. पाऊस संपून थंडीची चाहूल लागल्याने पर्यटकांची पावले पर्यटनाकडे वळत आहेत.

पुणे विभागात कार्ले, भाजे, तारकर्ली, हरिहरेश्वर, दापोली, महाबळेश्वर, पानशेत, भीमाशंकर, माळशेज, नाणेघाट अशी अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. यामध्ये प्रामुख्याने तारकर्ली येथील समुद्रकिनारा, महाबळेश्वर, वाई, पाचगणी या ठिकाणांना पर्यटकांकडून सर्वाधिक पसंती असल्याचे दिसते. याबाबत प्रादेशिक व्यवस्थापक मौसमी कोसे म्हणाल्या, 'नाताळ आणि नववर्ष स्वागतासाठी पर्यटकांनी महामंडळाच्या निवासस्थानांमध्ये मोठ्या प्रमाणात आरक्षण केले आहे. राज्यभरातील निवासस्थानांत आतापर्यंत 85 ते 90 टक्के आरक्षण झाले आहे.

औरंगाबाद, कोयना, महाबळेश्वर, कार्ला, पानशेत आदी निवासस्थानांत बहुतांश पूर्ण क्षमतेने आरक्षण झाले आहे, तर माळशेज, भीमाशंकर यांसह कोकण विभागातील तारकर्ली, दापोली, वेळणेश्वर, गणपतीपुळे, कुणकेश्वर, हरिहरेश्वर आदी निवासस्थाने 75 ते 80 टक्के आरक्षित झाली आहेत.' दरम्यान, नाताळ आणि नववर्षानिमित्त महामंडळाच्या निवासस्थानांना विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच, नववर्ष स्वागताची तयारी करण्यात आली असून, पर्यटकांसाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT